सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस अधिकार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गृह विलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देश दिले. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच, कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी आज कोकण, पुणे तसेच नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची कोरोनाविषयक आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत, कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी.कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपचारांचा आणि इतर सुविधांचा दर्जा चांगला राहील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः भेट द्यावी. उन्हाळा सुरू झाल्याने पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत, शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही शिंदे यांनी दिले. रक्ताचा पुरवठा नियमितपणे व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्ष, पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. गर्दीचे नियमन करावे, मास्क परिधान करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा विविध सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.


हे वाचा- … अन्यथा ९ एप्रिलपासून व्यापारी आपले व्यवसाय सुरू करणार

First Published on: April 6, 2021 8:14 PM
Exit mobile version