राज्यातील बड्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली

राज्यातील बड्या पाच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्र पोलिस दलात राज्य शासनाकडून मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील पाच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा बदलीचा आदेश सोमवारी राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आला. प्रामुख्याने मुंबईचे लोहमार्ग आय़ुक्तपदी तसेच सायबर कक्षाच्या पोलिस अधिक्षक पदाच्या बदल्या या मुख्य मानल्या जात आहेत. काही प्रतिक्षेतील आयपीएस अधिकाऱ्यांही या आदेशान्वये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच लालुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे या पदावरही नवीन व्यक्तीची नेमणुक करण्यात आली आहे.

कोणाची बदली कुठे ?

महेश पाटील यांची बदली पोलिस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथून पोलिस उपायुक्त (गुन्हे) मीरा भाईंदर, वसई, विरार, पोलीस आयुक्तालयात करण्यात आली आहे. पंजाबराव उगले यांना गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही पदावर नेमण्यात आले नव्हते. त्यांना पोलिस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची बदली मुंबईच्या लोहमार्ग पोलिस आयुक्तालयात पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. रवींद्र सेणगावकर जे सध्याचे लोहमार्ग पोलिस आयुक्त, मुंबई आहेत, त्यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई याठिकाणी करण्यात आली आहे. संजय शिंत्रे जे पोलिस अधिक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक आहेत, त्यांची बदली पोलिस अधिक्षक, सायबर कक्ष मुंबई येथे करण्यात आली आहे.


 

First Published on: February 15, 2021 6:17 PM
Exit mobile version