मातोश्रीच्या भरवशावर निवडून येणेही मुश्किल; शिंदे सरकारच योग्य

मातोश्रीच्या भरवशावर निवडून येणेही मुश्किल; शिंदे सरकारच योग्य

राज्यात सत्तेत असूनही नांदगाव मतदार संघाच्या विकासासाठी मला संघर्ष करावा लागत होता.. छगन भुजबळांनी कामे होऊच द्यायचे नाही असे ठरवले होते. या विरोधात मी वारंवार उद्धवसाहेबांकडे तक्रार केली. पण त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर भुजबळांविरोधात मला उच्च न्यायालयात जाऊन दाद मागावी लागली. मातोश्रीच्या भरवश्यावर मी राहिलो असतो तर पुढील निवडणुकीत माझा पराभव निश्चित होता, असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी ‘दै. आपलं महानगर’शी बोलताना केले. उद्धवसाहेब चांगले आहेत, पण त्यांच्या आजूबाजूची मंडळी त्यांच्यापर्यंत लोकप्रतिनिधींना पोहोचू देत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन गुजरात गाठले होते. त्यात पहिल्या चार आमदारांमध्ये सुहास कांदे यांचा समावेश होता. त्यानंतर बराचकाळ आमदार कांदे ‘नॉट रिचेबल’ होेते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कांदे यांनी वर्तमानपत्रांना पूर्ण पान जाहिरात देऊन एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. या जाहिरातीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या फोटोंसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही फोटो टाकण्यात आले. तर, दुसर्‍या बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे फोटो टाकण्यात आले. या फोटोंमुळे आमदार कांदेंनी केलेली जाहिरात चर्चेत आली. यासंदर्भात भावना जाणून करण्यासाठी ‘आपलं महागर’ने आ. कांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक स्फोटक बाबी ‘ऑन दि रेकॉर्ड’ सांगितल्या.
नांदगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी शिंदे साहेबांबरोबर आहे, असे सांगत आ. कांदे म्हणाले की, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही राष्ट्रवादीचे नेते आम्हाला कामे करण्याची संधी देत नव्हते. माझ्या मतदारसंघात सुमारे एक हजार कोटींच्या योजना मंजूर असूनही टेंडरअभावी प्रलंबित आहेत. यासंदर्भात उद्धव साहेबांकडे वारंवार मागणी केली. परंतु, मागण्या पूर्णच होत नसल्याने मी थकून गेलो होतो. मला माझे भवितव्यच अंधारात दिसू लागले. पाच वर्षे आमदार झालो आणि नंतर घरी बसलो असे झाले तर निवडणूक कशासाठी लढलो असा प्रश्नही विचारला जाईल. काम करण्याची क्षमता असतानाही केवळ नेत्याला वेळ नाही म्हणून योजना पुढे सरकणार नसतील तर त्या नेत्याबरोबर राहून काय साध्य होणार होते? उद्धव साहेबांनी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक भावनिक भाषणे केलीत. पण केवळ भावनिक होऊन चालणार नाही. आमदारांना बळ द्यायचे असेल तर त्यांची कामे होणे गरजेचे आहे. या संदर्भात माझ्यासह अनेक आमदारांचे हेच मत होते की, उद्धवसाहेब आजारपणामुळे त्रस्त आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिंदे साहेबांकडे दिले असते तर शेवटच्या अडीच वर्षात कामे तरी झाली असती. त्याचा फायदा पक्षालाच झाला असता. परंतु, उद्धवसाहेबांच्या आजूबाजला जेे दोन-पाच लोक असतात, ते साहेबांपर्यंत आपल्याला पोहोचू देत नाहीत. ते साहेबांना सोडतच नाही. झोपेतून उठवायलाही तेच असतात आणि झोपवायलाही तेच. लोक त्यांना काही उमजूच देत नाही. अशाने पक्षाला बळकटी कशी मिळणार?

आ. सुहास कांदे म्हणाले-
*छगन भुजबळांनी काम करुच द्यायचे नाही असे ठरवले होते
* वारंवार उद्धवसाहेबांकडे तक्रार करुनही दखल घेतली नाही
* सत्तेत असतानाही निधीसाठी उच्च न्यायालयात जावे लागले
*उद्धव साहेब चांगले पण आजूबाजूचे लोक त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाही
*काही लोक उद्धव साहेबांना सोडतच नाही. झोपेतून उठवायलाही
* तेच आणि झोपवायलाही तेच असतात.
* आपल्या मतदारसंघात तब्बल एक हजार कोटींच्या योजना प्रलंबित

..तर अधिक आमदारांचे मत बाद झाले असते
राज्यसभेत आपले मत बाद झाले त्यावरही आता लोक संशय घेत आहेत, असा प्रश्न कांदे यांना विचारला असता, मत जाणीवपूर्वक बाद करायचे असते तर मी एकटाच नाही तर अनेकांनी बाद केले असते, असे त्यांनी नमूद केले.

भुजबळांसह कुणाहीबरोबर कुस्ती खेळायला आवडेल-
नांदगाव मतदारसंघात आता शिवसेनेकडून भुजबळांचेही नाव चर्चेत आले आहे, या प्रश्नावर कांदे म्हणाले की, मी पहिलवान होतो. लहानपणापासून मी कुस्ती केली आहे. त्यामुळे मला कुणाहीबरोबर कुस्ती करायला आवडेल. मी कुस्ती लढण्यापूर्वी पुरेशी तालीम केलेली असते. असेही कुणी बिनविरोध निवडून देणार नाही. त्यापेक्षा राजकीय आखाड्यात समोर येईल त्याच्याशी मी वैचारिकदृष्ठ्या चार हात करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

विधान परिषदेनंतर बाहेर जाण्याचा निरोप आला-
शिवसेनेत बंडखोरी करण्याचे नियोजन विधानपरिषद निवडणुकीआधी झाले होते का, असा प्रश्न विचारला असता आ. कांदे म्हणाले की, हे नियोजन आधी झाले असते तर मतेही फुटली असती. निवडणुकीनंतर मला निरोप आला. माझा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन मी तातडीने शिंदेसाहेबांबरोबर गेलो, असे ते म्हणाले.

शिंदेसाहेब जी जबाबदारी देतील..
कोणत्या मंत्रीपदावर काम करायला आवडेल, असा प्रश्न केला असता शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ते काम करण्यास तयार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले. कोणत्याही पदाची मी मागणी केलेली नाही. नांदगाव विधानसभा मतदार संघाची प्रलंबित असलेल्या कामांवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला खास बाब म्हणून मंजुरी
माझ्या मतदारसंघात २५ वर्ष झाले लोकांना पाणीच मिळत नाही. यासाठी मी करंजवण मनमाड पाणीपुरवठ्याची पाऊणेतीनशे कोटींची योजना आणली. पण त्यासाठी १५ टक्के स्वनिधी लागत होता. हे ४५ कोटी नगरपालिका कोठून आणणार? ही बाब मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगताच त्यांनी खास बाब म्हणून पूर्ण योजनेचा निधी देण्यास मान्यता दिली. माझ्या मतदारसंघातील इतके मोठे काम होणार असेल तर शिंदे साहेबांच्या पाठीशी मीच काय माझा संपूर्ण नांदगाव मतदारसंघही उभा राहिल.

या प्रलंबित योजनांकडे देणार लक्ष
* २५ वर्षे झाले लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पाऊणेतीनशे कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण करायची आहे
* ५६ खेडी योजना कालबाह्य झाली होती. त्यात १८ गावे समाविष्ट करुन ७4 खेडी योजना झाली. या योजनेची टेंडर नोटीस झाली आहे.
* नांदगावची लोकसंख्या वाढल्याने प्रत्येकी १५५ लिटर पाणी वापरात येते. या पार्श्वभूमीवर गिरणा धरण ते नांदगाव योजनेचे आरक्षण वाढवून घेतले. या योजनेचीही टेंडर नोटीस आहे रस्त्यांचा विकास आणि काही पुलांची कामे करायची आहेत
* अनेक तांड्याची लोकसंख्या वाढली असली तरी त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती नाही. या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या तर त्यांना वित्त आयोगाचा निधी मिळेल.

First Published on: July 2, 2022 2:03 PM
Exit mobile version