एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत

एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत

गेल्या काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, त्यावेळीसु्द्धा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला यावरूनच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. (It was decided a year ago that the Airbus project would move to another state; But still the opponents create confusion – Udaya Samant)

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस हे प्रकल्पसुद्धा गुजरातला गेले. महाराष्ट्रातून एकूण तीन प्रकल्प गुजरातला गेल्याने एकच रणकंदन सुरु झाले आहे . याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मागील आठ महिन्यांत हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली नाही. तर ती 15 जुलै रोजी झाली. पण त्यानंतर तळेगावला गेल्यावर लक्षात आले की जी जमीन आम्ही वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पासाठी देणार होतो, त्या जमिनीवर साडेतीन हजार एकरवर इको-सेन्सिटिव्ह झोन आहे आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे. त्यामुळे ती जमीन प्रकल्पासाठी देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचसोबत त्या जमिनीचे सर्व कागदपत्र पूर्ण करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षांचा काळ लागतो आणि हे वेदांताच्या मालकाला माहीत असल्याचे उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, पुढे उदय सामंत म्हणाले, ”आपण स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही. आधीच महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्याचं खापर आमच्यावर फोडायचं. त्याबद्दल आता चर्चा करायची आणि संभ्रमावस्था निर्माण करायची हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून एअरबस प्रकल्पाबाबत काही लोक बोलत आहेत. स्टेटमेंट करत आहेत. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला.

एअरबस प्रकल्पासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आणण्यात येईल, असं मी म्हणालो होतो. पण त्या वेळी संबंधित यंत्रणांकडून मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार तेव्हा मी तसं म्हणालो होतो. एखादा प्रकल्प राज्यात येत असेल तर उद्योगमंत्री म्हणून मी काही चुकीचं बोललो असं मला वाटत नाही. पण त्यानंतर मी वस्तुस्थिती पाहिली तेव्हा समजले की 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा यांचा सामंजस्य करार झाला होता. सामंजस्य करार झाला म्हणजेच प्रकल्पाची जागासुद्धा निश्चित झाली आहे, असा अलिखित नियम आहे. 30 ऑक्टोबरला त्याचे भूमिपूजनसुद्धा आहे. 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही मंडळी असं म्हणतात की मागील दोन ते महिन्यात महाराष्ट्रातील एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेला. दरम्यान, जमिनीची पाहणी करून एखाद्या प्रकल्पासंबंधित डिफेन्सशी संबंधित परवानगी मिळविणे हे काही 90 दिवसांत शक्य नाही आणि म्हणून टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणार हे एका वर्षांपूर्वीच ठरले होते. हे अनेकांनी माध्यमातून सांगितले आहे. पण हे सर्व स्वीकारायचे नाही, असा टोला उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.


हे ही वाचा – केंद्रात-राज्यात भाजप सरकार, मग महाराष्ट्रातील एक इंजिन फेल का?ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

First Published on: October 28, 2022 3:00 PM
Exit mobile version