जैसवाल यांच्या नियुक्तीमुळे सीबीआयचा गैरवापर थांबेल – रिबेरो

जैसवाल यांच्या नियुक्तीमुळे सीबीआयचा गैरवापर थांबेल – रिबेरो

Phone tapping case : CBI प्रमुख सुबोध जैस्वाल यांचा सायबर गुन्हे शाखेच्या प्रश्नावलीला प्रतिसाद

केंद्रिय गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख म्हणून सुबोध जैसवाल यांच्या नियुक्तीने सीबीआयमध्ये निर्माण झालेली अनागोंदी कमी होईलच; पण उठसूठ अटकेच्या होत असलेल्या कारवायांनाही पायबंद बसेल, एकार्थाने सीबीआयचा गैरवापर थांबेल, असा विश्वास मुंबईचे ज्येष्ठ निवृत्त पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केला आहे. जैसवाल हे अत्यंत सचोटीचे आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्याकरवी कोणतीही कामे करून घेणे केंद्रातील सत्तेला आता शक्य होणार नाही. खर्‍या अर्थाने सीबीआयला स्वायत्तता मिळेल, असे रिबेरो म्हणाले. ते ‘आपलं महानगर’शी बोलत होते.

सीबीआयच्या प्रमुखपदी सुबोध जैसवाल यांची नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र सरकारपुढील अडचणी वाढण्याची शक्यता माध्यमांकडून वर्तवली जात होती. याबाबत विचारणा करता रिबेरो म्हणाले, असे काही होईल, असे मला वाटत नाही. सुबोध जैसवाल हे पोलीस दलातील प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. सरळ आणि अत्यंत सचोटीचे म्हणून त्यांची ओळख आहे. घटनेने निश्चित केलेले मार्ग सोडून वाहवत न जाणारे अधिकारी म्हणून जैसवाल यांची ख्याती आहे. आजवर सीबीआयचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जायचा. केंद्रातील सत्तेला हवा तसा उपयोग करून घेतला जायचा. जैसवाल यांच्यामुळे हा प्रकार थांबेल, असे रिबेरो म्हणाले.

राज्य सरकारच्या सेवेत असताना काही बाबी झाल्या असल्या तरी जैसवाल असल्या गोष्टींचे राजकारण करणार्‍यांमधील नाहीत. जे गैर दिसेल तिथे जाब विचारण्याची त्यांची कार्यपध्दती आहे. यासाठी ते कोणाचा दबाव स्वीकारणार नाहीत, त्यांचा तसा स्वभाव नाही, अशी ओळख रिबेरो यांनी जैसवाल यांची दिली. महाराष्ट्रातून केंद्राच्या सेवेत दाखल झालेल्या जैसवाल यांची नियुक्ती ही उच्चस्तरीय निवड समितीकडून करण्यात आली आहे. या निवड समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात. निवड समितीने ही निवड केल्याने त्यांच्यावर कोणाचा दबाव असण्याचा संबंध नाही आणि अमूक एका कामासाठी त्यांच्यावर दबावही आणता येणार नाही, असे ज्युलिओ रिबेरो यांनी स्पष्ट केले.

सध्या केंद्रातल्या सत्तेकडून विरोधी पक्षांच्या सरकारांवर तसेच तिथल्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी सीबीआयचा वापर केला जातो. सुशांतसिंग राजपुत याच्या मृत्यू प्रकरणाचे राजकारण हे अशाच दबावतंत्राचा भाग होता. एकीकडे अनिल देशमुखांची चौकशी होत असताना तसाच गुन्हा करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला सुटे सोडले जाण्याची पध्दत सीबीआयच्या आजवरच्या कार्यपध्दतीत आढळत नव्हती. आता पुन्हा तसे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. जैसवाल यांची कार्यपध्दती अशाच दर्जाची असल्याने सीबीआय अधिक सक्षम होईल, असा विश्वास रिबेरो यांनी व्यक्त केला.

First Published on: May 26, 2021 11:58 PM
Exit mobile version