जळगावची तहान भागवणार गिरणा धरण

जळगावची तहान भागवणार गिरणा धरण

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळ परिस्थतीची पाहणी करण्यासाठी जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे, भडगाव तालुक्यातील तांदलवाडी, पाचोरा तालुक्यातील हडसन, सामनेर, जळगाव तालुक्यातील वडली, वावडदा या गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच परिसरातील पीक आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे या गावास भेट दिली असता या गावातील एकाच विहिरीवर इतर दोन गावांची पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे गावास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असता भविष्यातील पाणी पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विहीर/बुडक्या घेण्याची सुचना त्यांनी यंत्रणेला दिली.

अखेर नाशिक, नगरमधून जायकवाडीला पाणी सोडले

कपाशीवरील बोंड अळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आतापर्यंत ३ हजार ३०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई जाहिर केली. या नुकसान भरपाईचा ६४० कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता राज्य शासनाने कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असल्याची माहिती त्यांनी तरवाडे येथे दिली.

जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मोफत वैरण बियाणे उपलब्ध करुन देत असून ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे. तेथील शेतकऱ्यांनी चाऱ्याचे पीक घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत हाताळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी वावडदा शिवारातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात ४ हजार क्विंटल हरभरा बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असून याचा शुभारंभ आज पाटील यांच्या हस्ते हडसन ता.पाचोरा येथील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करुन शेतकऱ्यांना करण्यात आले.

First Published on: November 2, 2018 9:25 PM
Exit mobile version