जंजिरा किल्ल्याला गाईड मिळाला

जंजिरा किल्ल्याला गाईड मिळाला

ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावरील बंद करण्यात आलेली गाईड व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली असल्यामुळे पर्यटकांकडून समाधान वक्त करण्यात येत आहे. किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे साडे पाच लाख पर्यटक येथे येत असतात. चारही बाजूला समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने येथे कधीही पाण्याची टंचाई भासत नाही.

किल्ल्याचे पर्यटकांना खूप आकर्षण असल्याने येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या किल्ल्यावरील काही दिवसांपासून गाईड व्यवस्था बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्याविषयी माहिती मिळत नव्हती. गाईड बंद केल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणे बंद झाले होते. त्यामुळे पुरातत्व विभागाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये रोष वाढला होता. जंजिरा किल्ल्यावरील गाईड व्यवस्था बंद केल्याचे समजताच मुरुड तालुका प्रवाशी संघटना आक्रमक होऊन प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी काही पत्रकारांना घेऊन थेट जंजिरा किल्ला गाठला. याबत या किल्ल्यावर असणारे परिचारक प्रकाश गोगरे यांना याबाबत विचारणा केली.

येथे असणारे गाईड पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारात होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सदरची गाईड व्यवस्था बंद करण्यात आली होती. परंतु पर्यटक व प्रवाशी संघटनेने मागणी केली म्हणून आम्ही ही व्यवस्था पूर्ववत करीत आहोत. गाईड बाबतची तक्रार पुन्हा होता कामा नये अशी अपेक्षा यावेळी गोगरे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी विशेष आभार व्यक्त केले. गाईड व्यवस्था सुरू झाल्याने असंख्य पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे

First Published on: November 1, 2019 1:15 AM
Exit mobile version