जावेद अख्तर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंसमोर का दिल्या ‘जय सियाराम’च्या घोषणा; म्हणाले…

जावेद अख्तर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंसमोर का दिल्या ‘जय सियाराम’च्या घोषणा; म्हणाले…

मुंबई – दिवाळी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बॉलिवडूमधील प्रसिद्ध पटकथाकार जोडी सलीम – जावेद अर्थात चित्रपट लेखक सलीम खान आणि लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जावेद अख्तर यांनी जय सियारामच्या घोषणा दिल्या. जावेद अख्तर यांनी लखनौच्या आठवणींना उजाळा देत भगवान राम आणि सीता या दोघांना वेगळं करता येत नाही. त्यांना जो वेगळा करतो तो रावण असतो असं सांगत, जय सियारामची तीनवेळा घोषणा दिली.
ते म्हणाले, आमच्यासाठी भगवान राम हे सर्वच बाबतीत आदर्श आहेत. भगवान रामाला वनवासात जायचे तेव्हा सीताही त्यांच्यासोबत गेली. त्यांच्यातील प्रेम आणि समर्पण आजही आदर्श आहे. त्यांना वेगळं करताच येत नाही. आम्ही लखनौमध्ये मोठे झालो, तिथं अभिवादनासाठी जय सियारामच म्हटलं जायचं. एवढचं नाही तर यापुढे आता जय सियारामच म्हणत चला असे आवाहन देखील जावेद अख्तर यांनी केले.

हेही वाचा : जावेद अख्तरांच्या हिंदू संस्कृतीच्या विधानावर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

जावेद अख्तर यांनी भारतीय लोकशाही ही हिंदूमुळे टिकून असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, आम्ही हिंदूंकडून जीवन पद्धती शिकली आहे. हिंदू हे आधीपासूनच सहिष्णू आहेत. त्यांच्यातील सहिष्णूता संपली तर तेही दुसऱ्यांसारखे होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

आज शोलेतील तो सीन लिहू शकलो नसतो

सलीम-जावेद जोडीने शोल चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. आज शोले चित्रपट तयार केला तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा मंदिरातील सीन आणि डायलॉग्जवर वादळ उठलं असतं, असंही जावेद अख्तर म्हणाले.
आज समाजामध्ये असहिष्णूता वाढली आहे. ही चांगली गोष्ट नाही, हिंदू असे नव्हते. हिंदूचं मन विशाल आणि तिथं विविध विचारांना स्थान होतं. ते जर नष्ट होत असेल तर तुम्ही देखील दुसऱ्यांसारखेच होऊन जाल, हे लक्षात ठेवा. हजारो वर्षांपासून आपण हे पाहात आलोय की मूर्ती पूजा करणाराही हिंदू, न करणाराही हिंदू, देव मानणारीही हिंदू आणि देव न माणनाराही हिंदू, ही हिंदू संस्कृती आहे. यातून आमच्यात लोकशाही मुल्य आली आहे. म्हणून हा लोकशाही देश आहे.

आम्हीच योग्य आणि बाकी सगळे चुकीचे, हे हिंदूचे काम नाही. जे तुम्हाला असं शिकवत असतील ते चुकीचे आहेत.
असं जावेद अख्तर म्हणाले.

दीपोत्सव कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते कळ दाबून शिवाजी पार्कमध्ये रोषणाई करण्यात आली. यावेळी जोरदार अतिषबाजीही करण्यात आली.

First Published on: November 10, 2023 6:48 PM
Exit mobile version