विरोधात असाल तर…, मुश्रीफांच्या कारवाईवर जयंत पाटील यांची सरकारवर टीका

विरोधात असाल तर…, मुश्रीफांच्या कारवाईवर जयंत पाटील यांची सरकारवर टीका

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. दीड महिन्यात सलग दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज पहाटेच मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी ईडीचे चार ते पाच अधिकऱ्यांचे पथक दाखल झाले. ज्यानंतर मुश्रीफांच्या समर्थकांकडून त्यांच्या घराबाहेर एकच गोंधळ घालण्यात येत आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ,मत व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कारवाईबाबत बोलताना म्हंटले आहे की, “ईडीकडून अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा धाड टाकण्यात आली आहे. ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा अशी छापेमारी केली जाणार आहे? हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता आहे.”

तसेच मुश्रीफ यांच्या मागे गेली दोन वर्षे सतत काही ना काही तरी कारवाई करण्याचे काम काही शक्तींकडून करण्यात येत आहे. विरोधात असणाऱ्या व्यक्तींवरच या धाडी टाकण्यात येत आहे, अलीकडच्या काळात यांच्यामध्ये सामील झालेल्या कोणावरही अशी कारवाई करण्यात येत नाहीये. त्यांची ना चौकशी करण्यात येते ना त्यांच्या विरोधातील अर्जाची दखल घेण्यात येते त्यामुळे हे सर्व काही जनतेच्या लक्षात येत आहे, असेही जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जर तुम्ही विरोधात असाल तर तुमचं काही खरं नाही. सर्व मार्गांचा अवलंब करून तुम्हाला जेरबंद करण्यात येईल, याचा पुन्हा एकदा प्रत्यय मुश्रीफांच्या घरी करण्यात आलेल्या कारवाईवरून आला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच सोमवारी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्याचा विचार असल्याचे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – हसन मुश्रीफांच्या अडचणी संपेना; कागल येथील घरी ईडीचा दुसऱ्यांदा छापा 

दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आल्याची सांगण्यात आले आहे. तसेच याप्रकरणात मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांची तपासणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे पथक मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करत ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कागल पोलीस आणि मुश्रीफ यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

First Published on: March 11, 2023 11:21 AM
Exit mobile version