हसन मुश्रीफांच्या अडचणी संपेना; कागल येथील घरी ईडीचा दुसऱ्यांदा छापा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज (ता. ११ मार्च) सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. संताजी घोरपडे कारखाना आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ED raids Hasan Mushrif's house in Kagal

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी ईडीचे पथक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (ता. ११ मार्च) सकाळी ४ ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी दाखल झाले. सलग दुसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीचे पथक हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर जमून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी सकाळी ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. या पथकाकडून मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची सांगण्यात आले आहे. तसेच याप्रकरणात मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांची तपासणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – भटक्या कुत्र्यांबाबतच्या बच्चू कडूंच्या वक्तव्याचे आसाम विधानसभेत पडसाद

दरम्यान, ईडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कागल पोलीस आणि मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी ईडीविरोधात संताप व्यक्त करत आता गोळी घालूनच जावा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुश्रीफांना हिशोब द्यावा लागेल : किरीट सोमय्या
हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची छापेमारी झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सोमय्या म्हणाले की, वास्तविकरीत्या ही कारवाई सुरूच आहे. जेव्हा दोन वर्षांपूर्वी मी गणपतीमध्ये कोल्हापूर येथे जाण्यासाठी निघालो होतो, तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी पोलीस बाळाचा वापर करून मला तिथे जाण्यापासून रोखले. तेव्हा मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत लक्षात आले होते. तर मुश्रीफ यांचा घोटाळा १०० कराडच्या घरात जात आहे आणि त्यामुळे कारवाई तर होणारच अशी माहिती देखील सोमय्या यांच्याकडून देण्यात आली आहे.