जयंतरावांच्या मुलाने आयफेल टॉवरवरुन केला मुलीला प्रपोझ, पवार म्हणतात आमची पोरं काय करतील नेम नाही

जयंतरावांच्या मुलाने आयफेल टॉवरवरुन केला मुलीला प्रपोझ, पवार म्हणतात आमची पोरं काय करतील नेम नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आमची पोरं काय करतील याचा नेम नाही असं मिश्किल वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान ही घटना सांगताना शरद पवारांनाही हसू आवरता आलं नाही. पवारही मनसोक्त हसून पत्रकार मंडळी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना किस्सा सांगत होते. शरद पवार यांनी राज्यातील घडामोडींवर मत व्यक्त केलं असून लखीमपुर घटना आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली आहे. शरद पवार यांनी सांगितले की, आमचे सर्व सहकारी आहेत त्यातील एकाची आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवांची आहे. जयंत पाटील यांच्या चीरंजीवांनी पॅरिसमध्ये काल रात्री आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोझ केला. त्यावर दोन्ही बाजूने होकार मिळाला आहे. त्यामुळे आता आम्ही थेट पॅरिसमध्ये पोहोचलो असून इस्लामपूरपर्यंत सिमित नाही. आम्हाला आता काळजी घ्यावी लागेल आमची मुलं कधी काय करतील त्याचा नेम नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच दोन्ही मुलं डोमेस्टिक असून लग्न इथेच होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

फडणवीसांवर निशाणा

मावळमध्ये काय घडलं? एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं. कारण त्यावेळी तिथे काय घडलं हे कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले, त्याला जबाबादार कुणी राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सरकारी नेते नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई केली. त्याला बराच काळ होऊन गेला आहे, असं शरद पवार म्हणाले. मावळबद्दलचं चित्र पूर्वीपेक्षा फार स्पष्ट झालं आहे. मावळमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्याकाळी सत्ताधारी पक्षाबाबत लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. पण आज मावळमधील लोकांना लक्षात आलं आहे की ज्यांच्यावर आपण आरोप केले, त्यांचा याच्याशी संबंध नव्हता. याउलट ही परिस्थिती हाताबाहेर जावी, यासाठी स्थानिक भाजपच्या लोकांनी प्रोत्साहित केलं आणि त्यामुळे संघर्ष झाला. म्हणून मावळमध्ये जो संताप होता, ते चित्र आता बदललं आहे, असं शरद पवार म्हणाले.

पवारांची पत्रकार परिषदेचा विषय कळाला नाही

फडणवीस यांनी म्हटलं आहे की, खरं म्हणजे शरद पवार यांची पत्रकार परिषद कशाला होती हेच कळाले नाही. याचे कारण ते वेगवेळ्या विषयावर बोलले पहिल्यांदा केंद्र सरकारविरोधात बोलले, ते म्हणाले की, मावळमधील गोळीबार पोलिसांनी केला होता. त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की जालियनवाला बागमध्ये गोळीबार करण्याकरता ब्रिटीशांचे जनरल गेले नव्हते तेव्हाच्या पोलिसांनीच केला होता पण त्या गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार करण्यात आला होता. त्यामुळे मावळचा गोळीबार हा ज्यावेळी आम्ही म्हणतो की जालियनवाला बागसारखा होता. त्यावेळी तिथे तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जाण्याची गरज नव्हती त्यांचे पोलीस त्या ठिकाणी होते असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले आहे.


हेही वाचा : सांगितल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य


 

First Published on: October 13, 2021 7:44 PM
Exit mobile version