सांगितल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

'पाहुण्यांनी' अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये - शरद पवार

sharad pawar
सांगितल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा, बहिणी आणि निकटवर्तीयांच्या घरांवर, कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारे सुरु आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. सांगितल्याशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

शरद पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरील आयकरच्या छापेमारीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी उत्तर देताना आयकर विभागाच्या कारवाईचा चांगलाच समाचार घेतला. “अजित पवारांचं स्टेटमेंट मी वाचलं. ते असं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. त्याची रिकव्हरी करण्यासाठी किंवा कुणी कर दिले नसतील तर त्यासाठी काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही ही माझीही अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. पण वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी बोलेन. पण या यंत्रणेची चौकशी थांबल्यानंतर बोलेन. ती चौकशी अजून सुरू आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“साधारण मी जी माहिती घेतली केंद्रातल्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून आणि उद्योग क्षेत्रातील लोकांकडून की असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात. एक-दोन-तीन दिवस असतात. पण आजचा सहावा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण व्हावा इतका पाहुणचार घेऊ नये. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही आहे. एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि तिसरी गृहिणी आहे. त्यामुळे त्यांचा याच्याशी संबंध नाही. ते तिथे गेले. ठीक आहे काही चौकशी करायची होती ती केली. एक-दीड दिवसाची चौकशी संपली. ते बिचारे काम संपल्यानंतर त्यांना जायची घाई होती. पण त्यांना सारखे फोन येत होते की थांबा, इतक्यात सोडू नका. नंतर त्यांना आमच्या मुलींनीच विचारलं की दोन दिवस झाले, तीन दिवस झाले की तुमचे घरचे वाट बघत असतील. तेव्हा ते म्हणाले आम्हाला जायचं आहे पण आम्हाला निर्देश आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे ५ दिवस झाल्यानंतर आज सहाव्या दिवशी देखील काही ठिकाणी अजून पाहुणे आहेत. आत्तापर्यंत अशा चौकशा झाल्या आहेत. पण ५-६ दिवस एखाद्याच्या घरात जाऊन चौकशी केल्याचं ऐकिवात नाही. काही नवीन धोरणं स्वीकारली असतील तर त्याबाबत तक्रार करण्याची ही वेळ नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा विचार करता येईल.

दोन माणसांची चौकशी करायला १८ लोकं गेली

कोल्हापूरला काही जास्त लोक घरी राहत नव्हते. त्यांच्याकडे नवरा-बायको राहतात. त्यांच्या घरी फक्त १८ माणसं गेली. पण जे कधी पाहिलं नव्हतं, ते घडलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. सत्तेचा गैरवापर आम्ही करत नाही, केला नाही, असं पवार म्हणाले.


हेही वाचा – मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं; फडणवीसांच्या टीकेला पवारांचं उत्तर

सांगितल्याशिवाय बाहेर न पडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य