“जोड्याने मारलं पाहिजे याला..;” बागेश्वर बाबांवर जितेंद्र आव्हाड कडाडले

“जोड्याने मारलं पाहिजे याला..;” बागेश्वर बाबांवर जितेंद्र आव्हाड कडाडले

"जोड्याने मारलं पाहिजे याला..!" असं म्हणत जितेंद्र आव्डाढ यांनी बागेश्वर बाबांवर जोरदार टीका केलीय.

कथित चमत्कारामुळे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आहेत. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून, संत तुकाराम यांच्याबाबत अपमानास्पद विधान केलंय. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून बागेश्वर बाबांवर टीकास्त्र सुरू झालंय. त्यामुळे बागेश्वर बाबा पुन्हा एकदा नव्या वादाच्या कचाट्यात सापडणार आहेत. बागेश्वर बाबांनी केलेल्या या अपमानास्पद विधानावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे बागेश्वर बाबांवर चांगलेच कडाडले आहेत. “जोड्याने मारलं पाहिजे याला..!” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबांवर जोरदार टीका केलीय.

बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्रवचन देत असताना संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. “संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा केला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारे बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसता, असं देखील बागेश्वर म्हणाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये हे विधान केलंय.

बागेश्वर बाबांच्या या अपमानास्पद विधानामुळे राज्यभर तीव्र प़डसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत बागेश्वर बाबांवर टीका केलीय. “या असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर, “तुका म्‍हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा”ही उक्ती योग्यच वाटते. अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर, “जोड्याने मारल पाहिजे याला..!” यावरच समाधान होत.” असं या ट्विटमध्ये लिहिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असेल, तर ते दाखवणे बंद करा. संत तुकारामांविषयी कुणी काही वादग्रस्त बोलले असेल, तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकामार यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा संदर्भ दिला. त्यांच्या विधानाने केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाला. त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागावी, असे ते म्हणाले.

First Published on: January 29, 2023 7:33 PM
Exit mobile version