जितेंद्र आव्हाड यांची मिश्किल टीका; म्हणे, ‘पीएमसी बँकेबाहेर लिंबू लावा’

जितेंद्र आव्हाड यांची मिश्किल टीका; म्हणे, ‘पीएमसी बँकेबाहेर लिंबू लावा’

मंगळवारी फ्रान्सने पहिल राफेल विमान भारताच्या स्वाधीन केले. हे विमान भारतात आणण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला गेले होते. त्यांनी राफेल विमानाची पूजा केली आणि सोबत विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले. त्यांच्या याच कृतीमुळे नेटीझन्सनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. आता या लिंबू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. राफेल विमानाखाली जसे राजनाथ सिंह यांनी लिंबू ठेवले तसेच पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या प्रत्येक शाखेबाहेर लिंबू लावावा, अशी मिश्किल टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतो, तर तुमचे पैसे का होणार नाहीत? असा मिश्किल सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला.


हेही वाचा – पहिलं राफेल उडालं खरं, पण चाकाखाली लिंबू घेऊन!


काय आहे पीएमसी बँक घोटाळा प्रकरण?

पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकारी यांच्या विरोधात मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००८ ते २०१९ या कालावधीत बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसल्याची माहिती आरबीआयपासून लपवून ठेवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. परिणामी बँकेला ४ हजार ३३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या पैशांमधून गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या गैरव्यवहारात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा हातभार होता, अशीही माहिती पुढे येत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी हा कट रचला. कर्जाची परतफेड न करता त्या रकमेचा फायदा स्वतःसाठी केला. त्यामुळे कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४७१, १२० (ब) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ

First Published on: October 9, 2019 3:47 PM
Exit mobile version