पत्रकार मारहाण प्रकरण : किशोर पाटलांवर कारवाई करण्याची पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पत्रकार मारहाण प्रकरण : किशोर पाटलांवर कारवाई करण्याची पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : जळगावच्या पाचोरा येथे स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी याच पत्रकाराला दूरद्धनीवरून शिवीगाळ करून धमकी दिली होती. या मारहाणीत संदीप महाजन हे जखमी झाले आहे. किशोर पाटील यांच्यापासून संदीप महाजन यांना आणि कुटुंबिला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे.

पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्ल्याविरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटील यांच्या मुजोरीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर किशोर पाटील यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

किशोर पाटलांवर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यमांच्या स्वातंत्र्यच धोक्यात आले असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला आहे. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी एस.एम. देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा – सत्तेची नशा अशी असते का? पत्रकार मारहाण प्रकरणावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नेमके काय आहे प्रकरण

एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण जळगाव जिल्ह्यात अलीकडेच घडले होते. यावरून संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमदार किशोर पाटील संतप्त झाले होते. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोनवरून शिवीगाळ करून मारहाणीची धमकीही दिली होती. याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडीओ क्लिप माझीच असल्याचे सांगत पाटील यांनी, पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता या पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली.

First Published on: August 10, 2023 3:42 PM
Exit mobile version