घरकूल कामात राज्यात कळवण अव्वल

घरकूल कामात राज्यात कळवण अव्वल

राकेश हिरे, कळवण

गोरगरीब व हक्काच्या घरापासून वंचितांना प्रधानमंत्री, शबरी व रमाई आवास योजनेंतर्गत कळवण तालुक्यात 2016-17 व 2017-18 या दोन वर्षांत सर्वाधिक वेगाने 2523 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3149 घरांचे उद्दिष्ट असून 3084 घरकूल लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येऊन 2891 प्रथम हप्ता दिला आहे. सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास कळवण पंचायत समितीला यश आल्याने घरकूल कामात कळवण तालुका राज्यात अव्वल ठरला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरवले असून सामान्यांना घर मिळावे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कळवण पंचायत समिती अंतर्गत गेल्या दोन वर्षात 2523 घरे पूर्ण केल्याने कळवण राज्यात अव्वल आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत दारिद्य्र रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदान दिले जाते. 4 टप्प्यापर्यंत दीड लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते. या अनुदानातून शौचालयासह घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे.

सर्वांसाठी घरे योजना या शासनाच्या घोषणेप्रमाणे कळवण तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत चालू वर्षात 3149 घरे बांधणार असल्याची माहिती सभापती जगन साबळे, उपसभापती पल्लवी देवरे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, माजी सभापती लालाजी जाधव, केदा ठाकरे, आशाबाई पवार, माजी उपसभापती विजय शिरसाठ, पंचायत समिती सदस्य मनीषा पवार, मीनाक्षी चौरे उपस्थित होते.

कामे प्रगतीपथावर

कळवणला 2016 – 17 वर्षात पंतप्रधान योजनेअंतर्गत 1213 , शबरी 325 तर रमाई आवास अंतर्गत 47 घरे पूर्ण केली आहे. 2017 -18 मध्ये पंतप्रधान आवास योजनेतर्गत 938 घरे पूर्ण केल्याने गेल्या दोन वर्षातील सर्वात वेगाने कामे केली. 2019-20 साठी कळवण पंचायत समितीला 3149 घरांचे उद्दिष्ट दिले असून 3084 लाभार्थीना मान्यता दिली असून 2891 घरकुल लाभार्थीना पहिला हप्ता प्रदान केला आहे. 206 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता तर 60 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता दिला आहे.

कळवण तालुक्यात गेल्या वर्षापासून घरकुलसह सर्व योजनांचे काम जलद गतीने पार पडत आहे. पुढील वर्षात संपूर्ण 3149 घरे बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत – जगन साबळे, सभापती पंचायत समिती कळवण
ऑनलाईन प्रणालीमुळे बँकखात्यांमध्ये रक्कम मिळते. त्यामुळे घरांच्या बांधकामाचा दर्जाचा सुधारतो आहे.– पल्लवी देवरे , उपसभापती
गेल्या दोन वर्षात 2523 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षी 3149 घरकुलाचे काम पूर्ण करणार असून घरकूल कामात कळवण राज्यात अव्वल ही पंचायत समितीची कौतुकास्पद कामगिरी आहे. -नितीन पवार, सदस्य , जिल्हा परिषद नाशिक
First Published on: July 23, 2019 5:59 PM
Exit mobile version