शिक्षक भारतीकडून सत्यजीत तांबेंना पाठिंबा, सुधीर तांबेंनी मानले आभार

शिक्षक भारतीकडून सत्यजीत तांबेंना पाठिंबा, सुधीर तांबेंनी मानले आभार

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार असलेल्या सत्यजीत तांबे यांना शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस नेते सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन निवडणुका लढवल्या. तीनही निवडणूक लढवत असताना सगळ्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला. पहिल्यावेळेस मला पक्षाचा पाठिंबा नव्हता. म्हणजे मी अपक्ष होतो. पण सर्व शिक्षकांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. माझ्या मनात शिक्षकांबद्दल सदैव कृतज्ञतेची भावना आहे. मला शिक्षक भारती संघटनाने सहकार्य केलं. मला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहे, असं सुधीर तांबे म्हणाले.

शिक्षकांच्या हक्कासाठी दोन आमदार

सामान्य माणसाचं शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणाची महत्त्वकांक्षा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शिक्षकांना पेन्शन योजना मिळाली पाहिजे. शिक्षकांचे सर्व प्रश्न सुटायला हवेत. कपिल पाटील यांनी औरंगाबादला मोठा मोर्चा काढला होता. तेव्हा मी तिथे सुद्धा उपस्थित होतो. मी काही दिवसांनी माजी आमदार होणार आहे. पण माजी आमदार म्हणूनही काम करता येईल. शिक्षकांच्या हक्कासाठी दोन आमदार आमच्या परिवारातील राहतील. पुरोगामी विचारांशी आमची बांधिलकी कायम राहील, असंही सुधीर तांबे म्हणाले.

कपिल पाटील माझ्यासाठी…

या राज्यातील असा एकही तालुका नाही जिथे मी काँग्रेसचं काम केलेलं नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय. मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.


हेही वाचा : मतं फोडण्याचं काम भाजपचं, सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया


 

First Published on: January 18, 2023 6:35 PM
Exit mobile version