‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला’

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला’

सीमाभागातील मराठी बांधवांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असताना या मराठी बांधवांसाठी कायम भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर आता कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून प्रखर टीका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना सीमेवर उभं करून गोळ्या घातल्या पाहिजेत’, असं खळबळजनक वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील यानं केलं आहे. बेळगावप्रश्नी आज कनसेची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्याने हे वक्तव्य केलं. यानंतर शिवसेनेकडून त्यावर तीव्र टीका करण्यात आली आहे. कर्नाटकमधील त्या बेळगाव भागातील खासदारांवर टीका करताना त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर निशाणा साधला.

काय म्हणाला भिमाशंकर पाटील?

यावेळी बोलताना भिमाशंकर पाटील म्हणाला, ‘गेल्या ६४ वर्षांपासून बेळगावच्या जनतेला वेठीला धरणाऱ्या आणि कर्नाटकच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना आपल्या खासदारांनी कधी जाब विचारला आहे का? १९७२मध्ये राकसकोप धरणामध्ये विष कालवून कन्नड भाषिक जनतेचा जीव घेण्याचा कट रचणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला आपले खासदार कधी जाब विचारणार?’ यासोबतच तो म्हणाला, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या सदस्यांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर उभे करून गोळ्याच घातल्या पाहिजेत. आमचा तुम्हाला त्यासाठी पाठिंबा असेल. जे काही व्हायचंय, ते होऊन जाऊद्या’.

महाराष्ट्र एकीकरणाचा लढा १९५६ सालापासून सुरू आहे. त्यामुळे ज्यांना या लढ्याविषयी काहीही माहिती नाही, त्यांच्याकडून अशी वक्तव्य येत आहेत. अशा लोकांच्या वक्तव्यावर उलट उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. पण जर त्यांना काही करायचंच असेल, तर त्यांनी समोर यावं, त्यांना त्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल.

दीपक दळवी, महाराष्ट्र एकीकरण समिती

शिवसेनेचं आव्हान

भिमाशंकरच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून त्याचा समाचार घेण्यात आला आहे. ‘गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावमधील नागरिकांची महाराष्ट्रात येण्याची मागणी आहे. मात्र ती पूर्ण होत नाहीये. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी बॉर्डरवर येऊन बघावं. आम्ही त्याला दाखवून देऊ शिवसेनेची ताकद काय आहे ते’, असं आव्हान शिवसेनेचे खासदार राजेश क्षिरसागर यांनी दिलं आहे.

First Published on: December 26, 2019 6:51 PM
Exit mobile version