कसबा पेठ पोटनिवडणुकीत आमचे चुकले!

कसबा पेठ पोटनिवडणुकीत आमचे चुकले!

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमची चूक झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या चुका आमच्या लक्षात आल्या असून त्या आता पुन्हा होणार नाहीत. कसबा पेठ ही पोटनिवडणूक होती. येथील निकालाने आम्ही सावध झालो आहोत. आता आम्ही कामाने लोकांची मने जिंकू. त्यामुळे कसब्यात पुढे काय निर्णय येईल तो बघा, असेही शिंदे यांनी सांगितले.

अजित पवार यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारची कामगिरी दिसत नाही. कामगिरी दिसली तरी ते मान्य करायला तयार नाहीत. आमच्यावर घटनाबाह्य सरकार अशी टीका करणारे तुम्ही मग घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात काय, असा सवाल करताना शिंदे यांनी अजित पवार यांचा उल्लेख शिवसेनेचे प्रवक्ते असा केला. लोकसेवा आयोग की निवडणूक आयोग यापेक्षा रिझल्टला महत्त्व आहे आणि मी रिझल्ट दिला. मी असे काही बोललो नाही की ज्यामुळे मला यशवंतरावांच्या समाधीसमोर बसून आत्मक्लेश करावा लागेल, असा सणसणीत टोलाही शिंदे यांनी लगावला.

विधानसभेत गेले दोन दिवस सुरू असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उत्तर दिले. आपल्या नर्मविनोदी शैलीत विरोधी पक्षाने केलेली टीका शिंदे यांनी हसतखेळत परतवून लावली. त्याचवेळी अजित पवार यांचा वारंवार उल्लेख करीत शिंदे यांनी त्यांना हळूवार चिमटे काढले. विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या टोप्या उडवताना शिंदे यांनी काही राजकीय मुद्यांना स्पर्श करीत विरोधी पक्षाला उघडे पाडण्याचा इशारा दिला. एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठ महिन्यांत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची उजळणी करताना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविणार असल्याची ग्वाही दिली. त्याचवेळी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावाही त्यांनी केला.

कसबा पेठच्या निकालावरून अजित पवार यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिंदे यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही सामान्य जनतेने तुम्हाला पराभूत केले याकडे लक्ष वेधले. ही पोटनिवडणूक होती. सार्वत्रिक निवडणुकीला आम्ही युती म्हणून लढणार आहोत. तुम्ही आघाडीत तीन पक्ष आहात आणि तुम्ही वेगळे लढला होतात. त्यामुळे एक पक्ष निवडणुकीला उभा राहणार आणि दुसरा काय भजन करणार काय, असा सवाल करीत शिंदे यांनी आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कसब्यातील निकालानंतर आता देश आणि राज्य जिंकण्याची भाषा झाली, पण तीन राज्ये भाजपने जिंकली हे विसरले आणि काही जणांची स्थिती बेगाने शादी मैं अब्दुल्ला दिवाना अशी होती, असा टोला शिंदे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला नाव न घेता लगावला. भाजप पोटनिवडणुकीत हरते आणि राज्य जिंकते हा भाजपचा इतिहास असल्याचे सांगत शिंदे यांनी आता आम्ही निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहोत. महाराष्ट्रात मी भाजपसोबत आहे आणि निवडणुकीत माझी मास्टरकी आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मला धक्का बसला होता, या विधानाचा समाचार घेताना शिंदे यांनी अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. दादांची पहाटेची शपथ माझ्यासाठी मोठा शॉक होता. याबाबत देवेंद्रजींनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. सगळेच काही सांगितले नाही. त्यामुळे यातील सुरस कथा हळूहळू बाहेर येत आहेत. त्या बाहेर आल्या की अनेकांची पंचाईत होईल. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसेल, असे शिंदे म्हणाले. अजित पवार यांनी महाराष्ट्रद्रोहावरून केलेल्या टीकेवरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवात मी केली नव्हती. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमशी व्यवहार केला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लागले आहे. त्यावेळी मलिक यांचा राजीनामा न घेता तुम्ही त्यांना पाठीशी घातले. अजितदादा तुम्ही त्यांचे प्रवक्ते झाला आहात. तुम्ही कडवट शिवसैनिकासारखे वागू नका, त्यांना जागा ठेवा, असा टोला शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या खर्चावरील टीकेलाही शिंदे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षे वर्षा बंगला बंद होता. तिथे फेसबुक, ऑनलाईन असतानाही खर्च झाला. आता माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येतात. मग त्यांना चहापाणी नको द्यायला. चहापाणी देणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे शिंदे म्हणाले. राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचावेत म्हणून आम्ही जाहिराती दिल्या. आम्ही सामना, सकाळ सर्वांना जाहिराती देतो. आता घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला चालतात. पूर्वी माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच जाहिरात होती. आता आम्ही माझा महाराष्ट्र, गतिमान महाराष्ट्र अशी जाहिरात करीत असून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविणार आहोत, असे शिंदे म्हणाले.

योग्य वेळी स्थगिती उठविणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधी बाकांवरून स्थगिती उठविण्याची मागणी होत होती. त्यावेळी आपल्या सरकारने स्थगिती का दिली हे स्पष्ट करताना एकनाथ शिंदे यांनी विकासकामावरील स्थागिती योग्य वेळी उठविली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी शिंदे यांनी गेल्या आठ महिन्यांतील सरकारच्या निर्णयांचा पुनरुच्चार केला.

First Published on: March 4, 2023 6:00 AM
Exit mobile version