काश्मीर फाईल 2 काढा, सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण दाखवा, संजय राऊतांचा टोला

काश्मीर फाईल 2 काढा, सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण दाखवा, संजय राऊतांचा टोला

मुंबईः 370 कलम हटवल्यावरसुद्धा तिकडच्या परिस्थितीत अजिबात बदल झालेला नाही. काश्मीर फाईल चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्यांनी 400 ते 500 कोटी रुपये कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन आणि हत्या सुरू आहे, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या काश्मीर फाईल 2 ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावलाय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. काश्मीरची हालत खूपच गंभीर आहे. मी काल पाहिलं गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरांबरोबर आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकारनं प्रयत्न केले तरी आज तीच परिस्थिती निर्माण झालीय. जी 1990मध्ये झाली होती. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं बोलला होतात आणि मतंसुद्धा मागितली होती. 370 हटवल्यानंतरही काश्मिरी पंडित, काश्मीरची जनतेच्या हालतमध्ये कोणतीही सुधारणा नाही. आजसुद्धा दोन जणांची हत्या झालीय. दोन्ही मजूर होते. निवडून निवडून काश्मिरी पंडितांना मारलं जात आहे. सरकारकडून कोणतीही सुरक्षेची व्यवस्था नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन जारी आहे. जर हे कोणत्या इतर पक्षाच्या काळात असतं, तर भाजपनं हिंदुत्व आणि काश्मिरी पंडितांच्या नावे देशात बवाल निर्माण केला असता. गृहमंत्री तुमचे, पंतप्रधान तुमचे, जम्मू-काश्मीरमध्ये तुमचं शासन आहे. तरीसुद्धा आमचे पंडित आणि भाऊ जीव गमवत आहेत. त्यांचा खून करण्यात येतोय आणि नाहीतर त्यांना पळून जावं लागत आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

मोहन भागवतांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो

काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील ते पाहणं गरजेचं आहे. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा या मोहन भागवतांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. या देशातील अनेक राज्यांमध्ये खास करून जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तिथला नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतोय. रोज त्यांना कार्यालयात आणि घरात घुसून मारलं जातंय. 370 कलम हटवल्यावरसुद्धा तिकडच्या परिस्थितीत अजिबात बदल झाला नाही. काश्मीर फाईल चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्यांनी 400 ते 500 कोटी रुपये कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन आणि हत्या सुरू आहे, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या काश्मीर फाईल 2 ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं, असंही ते म्हणालेत.

महाराष्ट्रातील वातावरण चांगलं राहावं म्हणून विरोधकांची भेट

राज्यसभेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रदूषित आणि गढूळ झालेलं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता आहे. घोडेबाजार जो शब्द आहे, तो अत्यंत वाईट पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मला दिसतंय. राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी आणलेला पैसा कुठून येतोय याचा तपास ईडीनं करायला हवा. आमदार विकत घेण्यासाठी आमदारांना जी प्रलोभनं दाखवली जातायत. त्यामागे कोण आहेत, याचा महाराष्ट्राच्या जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रातील वातावरण चांगलं राहावं यासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनी करायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू

First Published on: June 3, 2022 11:09 AM
Exit mobile version