केडीएमटीच्या बस स्टॉपला फेरीवाल्यांचा विळखा

केडीएमटीच्या बस स्टॉपला फेरीवाल्यांचा विळखा

केडीएमटी बस

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने एकीकडे उत्पन्न वाढीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केडीएमटीने बस थांबे चांगले बनविले आहेत. मात्र डोंबिवली पूर्वेकडील बाजी प्रभू चौकात असलेल्या केडीएमटीच्या बस स्टॉपला फेरीवाल्यांचा विळखा घातल्याने या स्टॉपकडे प्रवाशी वर्ग पाठ फिरवत असल्याचे दिसते. याच स्टॉपकडून एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाश्यांनी बस गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने मागणी केली आहे.

डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि सचिव राजू नलावडे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह परिवहन व्यवस्थापकांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
बाजीप्रभू चौकात एमआयडीसीच्या निवासी विभागासाठी केडीएमटी बस स्टॉप आहे. या स्टॉपला अनधिकृत फेरीवाल्यांसह टपरीवाल्यांनी विळखा घातला आहे. परिणामी या स्टॉपवर बसगाड्या उभ्या करण्यास, तसेच प्रवाशांना बसमध्ये चढण्याउतरण्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. केडीएमटीचा बस स्टॉप नक्की कुणासाठी बांधला आहे ? असा सवाल असोसिएशनने उपस्थित केला आहे.

सकाळ सायंकाळ या स्टॉपवर प्रवाश्यांची मोठी गर्दी असते तेव्हा रांग याच छोट्याश्या बस स्टॉप बाहेर जाते. त्यावेळी फेरीवाल्यांच्या कोंडीतून वयोवृद्ध व महिला प्रवाशांना वाट काढत थांबावे लागते. त्यातच काही बेशिस्त रिक्षावाले भाडे घेण्यासाठी आपापल्या रिक्षा उभ्या-आडव्या कशाही लावत असतात. जवळच असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय आणि केडीएमटीचे वाहतूक नियंत्रण कक्ष देखील आहे ,मात्र सर्वच हतबल झालेले दिसून येतात. निवासी विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी हाच बस मार्ग केडीएमटीसाठी सर्वात फायदेशीर मार्ग असतानाही प्रशासन मात्र प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने त्यांच्या निवेदनातून केला आहे.

वास्तविक निवासी मार्गावर बसफेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. कमीतकमी दर पाच मिनिटांनी एक बस बाजी प्रभू चौकातून सोडणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा या मार्गावर बसगाड्या वेळेवर धावत नसल्याने निवासी विभागातील प्रवाशांना रिक्षांचा मार्ग पत्करवा लागतो. रिक्षावाल्यांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत सायंकाळी गर्दीच्या वेळी परिवहन सेवेच्या बसेस वेळेत धावत नसल्याची तक्रार आहे. निवासी विभागातील ममता चौक आणि मिलापनगर बस स्टॉप यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे तेथेही प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी कायमस्वरुपी उपाययोजना करावी.अन्यथा प्रवासी वर्गासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असाही इशारा असोसिएशनने दिला आहे.

First Published on: December 1, 2022 10:35 PM
Exit mobile version