शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला केदार जाधव

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला केदार जाधव

केदार जाधव

भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनं यंदाच्या दिवाळीमध्ये एक आदर्श उभा केला आहे. यावर्षीची दिवाळी केदार जाधव आणि शेतकऱ्यांसाठी खास अशीच म्हणावी लागेल. कारण, यंदाच्या दिवाळीमध्ये केदार जाधवनं सामाजिक भान जपत शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. यंदाच्या वर्षी केदार जाधवनं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. यंदाची दिवाळी केदार जाधवनं कुटुंबियांसोबत साजरी केली. यावेळी खूप आनंद झाल्याची भावना केदार जाधवनं बोलून दाखवली. शिवाय शेतकऱ्यांना मदत केल्यानं हा आनंद द्विगुणित झाल्याचं देखील सांगितलं. यावेळी केदार जाधवच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं.

मराठवाड्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. परिणामी केदारनं आपल्या अन्नदात्याला मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी केदारनं उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘शिवार संसद’ या सामाजिक संस्थेला मोठी आर्थिक मदत केली आहे. ही संस्था शेतकऱ्यांसाठी काम करते. गेल्यावर्षी देखील केदारानं शेतकरी मेळावा भरवण्यासाठी ‘शिवार संसद’ या संस्थेला  मदत केली होती. यावेळी त्यापेक्षा देखील पुढे जात केदारनं शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे.

यावेळी बोलताना केदारनं मी दौऱ्यांमध्ये व्यस्त असलो तरी राज्यात काय सुरू आहे. याकडे माझी नजर असते. यंदा देखील उस्मानाबादमध्ये पाऊस कमी झाल्यानं दुष्काळ असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतल्याचे केदार जाधव सांगतो. मात्र मी खूप मोठे काम केले आहे असे मला अजिबात वाटत नसल्याचं केदारनं म्हटलं आहे.

First Published on: November 9, 2018 6:17 PM
Exit mobile version