पुण्यातील किसळवाणा प्रकार : जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

पुण्यातील किसळवाणा प्रकार : जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

पुणे : दोन दिवसांपूर्वीच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. महिलांप्रती प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत असताना पुण्यात महिलेच्या बाबतीत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेचे मासिक पाळीतील रक्त जादूटोण्यासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे.

२७ वर्षीय पीडित महिलेने आपला पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका नातेवाईकावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा, जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु असल्याचे समजते.

27 वर्षीय पीडित महिलेने 2 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. पीडित महिला आणि तिचा पती पुण्यातील विश्रांतवाडी भागात वास्तव्यास आहेत. प्रेमविवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी महिलेचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. अघोरी विद्येच्या आहारी गेलेल्या सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून मासिक पाळीतील तिचे रक्त कापसाने काढत ते 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना पीडित महिलेने आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

पोलिसांनी या घटनेप्रकरणी पीडित महिलेचा पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, म्हाधू कथले यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य महिला आयोगाकडून कारवाईचे निर्देश
पुण्यातील किळसवाण्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतील असून चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. पुण्यातील घटना अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाकडून देण्यात आले आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटुंब आजही आहेत हे दुर्दैवी असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

जादूटोण्यासंबंधी पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन
आपल्या आसपासच्या परिसरात जादूटोण्यासंबंधी नरबळी, अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथासारख्या घटना घडत असल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्यासंबंधी दोन घटना समोर आल्या होत्या. त्यावेळीही पुण्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

First Published on: March 10, 2023 2:47 PM
Exit mobile version