किरीट सोमय्यांचा शायराना अंदाजात भुजबळांना इशारा

किरीट सोमय्यांचा शायराना अंदाजात भुजबळांना इशारा

पोलखोल शस्त्र उपसत आरोपांच्या फैरी झाडत निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळांना दोषारोपमुक्तीवर शायराना अंदाजात इशारा दिला. आगे आगे देखो, होता है क्या.. या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती कमावल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केली. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भावना गवळी, छगन भुजबळ आणि अनिल परब यांना लक्ष्य केलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सोमय्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात विचारलं असता, त्याबाबत राज्य सरकारनं कारवाई करावी, असं सांगत त्यांनी त्या प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं. तर, छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त करण्यात आल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या. दरम्यान, पुढच्या आठवड्यात एका कॅबिनेट मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. अजित पवारांमध्ये हिंमत असल्यास त्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनची कागदपत्रं लोकांसमोर ठेवावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. ६५ कोटी रुपयांत हा कारखाना घेतला आणि त्यावर ७०० कोटीचं कर्ज घेतलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांच्या संदर्भातील एका याचिकेवर पुढच्या महिन्यात लोकायुक्तांसमोर सुनावणी आहे. परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय, मग अनिल परब अजूनही मंत्रिमंडळात कसे, असा सवालही सोमय्यांनी केला. भावना गवळीने ४० वेळा बँकेतून पैसे काढले. प्रत्येक वेळी २१ लाखांपेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून हे पैसे काढले गेले. असं असतानाही शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करतेय. एकूण ११८ कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचं असेल तर त्यांनी तसं सांगावं.

First Published on: September 9, 2021 5:27 PM
Exit mobile version