दिवाळीनंतर फटाके फोडणार, किरीट सोमय्यांचा इशारा; नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

दिवाळीनंतर फटाके फोडणार, किरीट सोमय्यांचा इशारा; नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा दिलाय. दिवाळीनंतर फटाके फोडणार असं ट्विट करत सोमय्यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिलाय. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय.

सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केली आहेत. आता नवाब मलिक कोणता खुलासा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचा इशारा देणार्‍या किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार असा दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसंच मोठा पर्दाफाश केल्यानंतर भाजपवाले तोंड दाखवू शकणार नाहीत असंही मलिक यांनी म्हटलंय. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. दिवाळीनंतर आपण सहा घोटाळे बाहेर काढणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्र्यांची नावं जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, याची चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढवल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

भाजपवाले तोंड दाखवू शकणार नाहीत – नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या या ट्विटला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.‘दिवाळीनंतर मीच मोठा भांडाफोड करणार आहे. असा भांडाफोड होईल की भाजप या महाराष्ट्रात तोंड दाखवण्यासाठी कुठे फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देतायत. आम्ही पोकळ धमक्यांना घाबरत नाही. मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे, ते समोर आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत.’

वानखेडे कुटुंबिय आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीसंदर्भात नवाब मलिक म्हणाले की, ‘तुमच्याकडे इतका मोठा पसारा आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सर्व काही आहे. नवाब मलिकांबाबत तुम्ही सात वर्षे खोदत आहात आणि अजूनही खोदत आहात. मात्र, मी काही केलंच नाही. तुम्ही काय करणार आहात? असा सवाल उपस्थित केला. जर रामदास आठवले दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे.’

दलाल निरज गुंडे एनसीबी कार्यालयात वानखेडेंना भेटला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा जवळचा व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत आहे. हा व्यक्ती निरज गुंडे आहे. हा मागील फडणवीस सरकारचा दलाल आहे, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

निरज गुंडे या व्यक्तीने नवाब मलिक यांच्या मुलाच्या जमीन खरेदी संदर्भात ट्विट केले होते. निरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री येऊन बसत होते. त्या दलालाला माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश होता. तो दलाल वर्षावर कायम फिरत असायचा, सगळ्या विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात जायचा. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासन्तास बसत असतो. अशी कोणती भीती या नेत्यांना वाटत आहे. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही सर्व प्रकरणे विधानसभेच्या पटलावर आणणार. असे नवाब मलिक म्हणाले.

या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटाना, दूताच्या माध्यमातून कशाला भेटता, अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

First Published on: November 1, 2021 12:14 AM
Exit mobile version