किस डे : प्रेमाच्या अभिव्यक्तीचा स्पर्श

किस डे : प्रेमाच्या अभिव्यक्तीचा स्पर्श

 नाशिक :  व्हॅलेंटाईन्स डेसाठी तरुणाईची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यातच आज सर्वत्र किस डे साजरा होणार आहे. दुसरीकडे, मंगळवारी (दि.१४) साजर्‍या होणार्‍या व्हॅलेंटाईन डेची जय्यत तयारीदेखील तरुणाईकडून सुरू आहे. व्हॅलेंटाईन्स वीक ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान साजरा केला जात आहे. या आठवड्यांत साजर्‍या होणार्‍या विविध डेज्साठी बाजारपेठादेखील सज्ज झाल्या आहेत. रविवारी (दि.१२) हग डे साजरा झाल्यानंतर सोमवारी किस डे साजरा होणार आहे. मानवाकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकवेळी माणूस प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. यातून स्वतःसह आपल्या आवडत्या व्यक्तीला आनंद देण्याचा भाव असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाने स्पर्श करणे, मिठी मारणे किंवा भेटवस्तू देणे अशा वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून आपण त्याच्याकडे व्यक्त होत असतो.

प्रेम व्यक्त करण्याचे असेच एक माध्यम म्हणून किस डे कडे पाहिले जाते. यातून प्रेमाची उत्कटता, काळजी, आपुलकी अशा अनेक भावना व्यक्त होत असतात. पाश्चात्य देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किस करणे सर्वमान्य असले तरीही आपल्या देशात संस्कृती व कायद्यामुळे त्याला निर्बंध आहेत. अर्थात, किस डे हा केवळ कपलसाठीच आहे असे नव्हे तर आई-मुलाच्या नात्यात तर बाळ जन्मल्यापासूनच मायेचा स्पर्श त्याला लाभत असतो. हे चुंबन खर्‍या अर्थाने सुरक्षेचे आणि मातृत्वाच्या निस्सिम प्रेमाचे प्रतिक मानले जाते. परंतु, मात्र अलिकडे तरुणाईच्या आततायी प्रकारांमुळे किस डेकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले जाऊ लागले आहे.

खुल्लम खुल्ला प्यार…!

दरवर्षी सोशल मीडियावर किस डेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यंदा मात्र पोलीस प्रशासन खुल्लमखुल्ला प्रेम करणार्‍या प्रेमी युगुलांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे दरवर्षीसारखे प्रकार यंदा घडणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. शहरातील लव्ह स्पॉट्सवरील चाळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस तैनात आहेत.

First Published on: February 13, 2023 2:26 PM
Exit mobile version