कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आक्षेपार्ह स्टेट्सवर कारवाईची मागणी

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आक्षेपार्ह स्टेट्सवर कारवाईची मागणी

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापूरात काल (ता. 06 जून) काही तरूणांनी आपल्या व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. ज्यानंतर ही बाब काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करत या तरुणांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर या संघटनांनी दुपारी 04 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या तरूणांनी पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा – दलितांना जीव नाही का? जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना सवाल; राज्यभर आंदोलनाचा इशारा

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तीन ते चार तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व तरूण अल्पवयीन असल्याचे उघड झाले. ज्यानंतर कोल्हापुरातील वातावरण शांत झाले. पण या प्रकरणावरून पुन्हा एकदा रात्री हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये महाराष्ट्रात या घटना पुन्हा घडू नये, यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर आज सकाळी (ता. 07 जून) 9.30 वाजल्यापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरूवात केली.

या घटनेनंतर कोल्हापूर शहरात जिल्हाबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण या आदेशांचे कोणतेही पालन न करता हिंदुत्ववादी संघटनांनी चौकात जमून आंदोलन करण्यास सुरूवात केली. पण हा जमलेला जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाल्याने यावेळी पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा पुढे कुठेही न नेता आहे त्याच जागी आंदोलन करावे, अशी विनंती करण्यात आली होती. पण आंदोलकांनी हेही आदेश न पाळल्याने पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.

या सर्व घटनेमुळे शहरातील मटण मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिसांकडून जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीहल्ला केला असून या तरूणांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. तर आजपासून ते येत्या 19 जूनुपर्यंत कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत.

तर या घटनेबाबत बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी परिस्थिती शांततेत आहे. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरु आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये बंदी आदेश असतानाही आंदोलन होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, काल त्यांनी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. आम्ही याबाबत रिस्पॉन्स करत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली असल्याची माहिती यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

First Published on: June 7, 2023 11:58 AM
Exit mobile version