रायगडसह कोकण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार

रायगडसह कोकण विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार

वरिष्ठांनी महत्त्वाच्या खात्यांसह राज्यमंत्री आणि त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाची दिलेली जबाबदारी आपण यशस्वारित्या पार पाडू, असा विश्वास व्यक्त करताना शासनाचा जास्तीत जास्त निधी रायगड जिल्ह्यासह कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी आणणार असल्याची निःसंदिग्ध ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या प्रथमच गुरुवारी येथे आल्या असताना विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे दिली. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील पाच वर्षे काम करणार असून, जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच माणगावातील उप जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, व्हिक्टोरीया क्रॉस मानचिन्ह धारक (मरणोत्तर) शहीद वीर यशंवतराव घाडगे यांची जयंती गुरुवारी येथील जुने तहसीलदार कार्यालय परिसरात उत्साहात पार पडली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी वीर घाडगे यांच्या स्मारकस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना त्यांनी घाडगे यांचे स्मारक नव्याने बांधणार असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्रशासन आणि माजी सैनिक संघटनेने आयोजित केले होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, ब्रिगेडियर आणि माजी खासदार सुधीर सावंत, निवृत्त कर्नल सी. जे.रानडे, घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मी घाडगे आणि कुटुंबीय, तसेच उपसभापती राजेश पानावकर, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, माणगाव माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सु. स. गायकवाड, प्रांत प्रशाली दिघावकर आणि अन्य शासकीय अधिकारी, माजी सैनिक, नागरिक उपस्थित होते.

First Published on: January 10, 2020 2:09 AM
Exit mobile version