चाकरमान्यांना कोण लुटतयं? कोकण रेल्वेची तिकीटं फुल्ल होण्यामागे कारण काय?

चाकरमान्यांना कोण लुटतयं? कोकण रेल्वेची तिकीटं फुल्ल होण्यामागे कारण काय?

Konkan railway ticket Booked 4 months before Ganpati festival

कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येतात. परंतु कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण अवघ्या काही मिनिटांमध्ये फुल्लं झालं. म्हणून चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे आणि कोकण रेल्वेच्या गाड्यांची सगळी तिकीटं चार महिन्यांआधीचं फुल्ल झालीयत. हे कसं झालं यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातायत. यामागे दलालांचा हात आहे का? चाकरमान्यांना कोण लुटतंय? कोकणवासियांची गणपतीवारी सुखाने होणार का? की यंदाही कोकणवासियांचा प्रवास खडतरचं होणार? जाणून घेऊया. ( Konkan railway ticket Booked 4 months before Ganpati festival )

120 दिवसांआधीच कोकण रेल्वेच्या गाड्यांची सगळी तिकीट्स फुल्ल झालेत. आता ही तिकीटं वेटिंग लिस्टमध्ये जातायत. कोकणकन्या, नेत्रावती, तुतारी, जनशताब्दी, तेजस, मांडवी आणि मत्सगंधा या सर्व गाड्या रोज कोकणात जातायत. परंतु, कोणत्याच गाड्यांची तिकीट सध्या उपलब्ध नाही आहेत.

मात्र आता याची दखल घेत कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तसचं, भाजपा आमदार नितेश राणेही कोकणातील प्रवाशांसाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

असं असलं तरीही कोणत्याही गाड्यांचं तिकीट का बुक होत नाही? हा प्रश्न कायम आहे आणि याबाबत माय महानगरने थेट रेल्वे प्रशासनाला विचारलं. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपूरे यांनी माय महानगरशी संवाद साधताना सांगितलं की, प्रवाशांनीच रेल्वेच्या तिकीट्स बुक केलेल्या आहेत. यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. कुठलाही काळाबाजार नाही. याप्रकरणी मध्य रेल्वेचे आरपीएफ, खासगी विभागामार्फत वारंवार तिकिट काऊंटरवर चौकशी केली जाते. त्यामध्ये सॉफ्टवेअरपासून सर्व वस्तुंची तपासणी केली जाते. त्यामुळे आक्षेपार्ह काहीच नाही”. याशिवाय, “ज्या प्रवाशांना तिकीट्स मिळालेल्या नाहीत. त्या प्रवाशांनी काळजी करू नये, कारण मध्य रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. त्यावेळी नव्याने तिकीट आरक्षण सुरू केले जाणार असल्याचंही शिवराज मानसपूरे यांनी सांगितलंय.

( हेही वाचा अधिकारासाठी जागृत कष्टकरी संघटनेचा मोर्चा )

पण, असलं तरीही अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वेची सगळी तिकीटं कोण बुक करतं हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे यंदाही चाकरमान्यांना कन्फर्म तिकीट मिळणार नसल्याचंच दिसतंय.

First Published on: May 25, 2023 2:27 PM
Exit mobile version