चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

लखीमपूर खेरी प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय, असा घणाघात राऊत यांनी भाजपवर केला आहे. तसंच, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. प्रियंका गांधी यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अस्तित्व दिसले, असं संजय राऊत म्हणाले.

“उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. तो मंत्रीपुत्र आजही मोकाट आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व या निमित्ताने पुन्हा दिसले!” असं राऊत यांच्या त्यांच्या रोखठोक या सदरामध्ये म्हटलं आहे.

“देशाचे राजकारण चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येमुळे ढवळून निघाले आहे. लखीमपूर खेरीत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. याच भागातले खासदार व केंद्रात गृहराज्यमंत्री असलेले अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष व त्यांचे मित्र जीप गाडीतून एका कार्यक्रमासाठी निघाले होते. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून त्यांचा पारा चढला व या महाशयांनी सरळ भरधाव गाडी त्या शेतकऱ्यांवर घातली. शेतकऱ्यांना चिरडून गाडी पुढे गेली, पण चाकाखाली एक शेतकरी अडकल्याने गाडी थांबली. तेव्हा हे सर्व मस्तवाल लोक पळून गेले.”

प्रियंका गांधींच्या अटकेने देश खडबडून जागा झाला

“हे सर्व प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या अंगलट आले आहे. चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आहेच, पण त्याच रात्री लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. ‘मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?’ या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते! प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने धाबे दणाणले

“४ ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा.”

त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली

“प्रियंकांची गाडी आधी रोखली. त्यांना गाडीतून उतरवले. पुढे जाऊ नये असे बजावले. त्यांनी नकार दिला. कोणत्या कायद्याने मला अडवताय हा त्यांचा प्रश्न. आपण पोलिसांच्या गाडीत बसा असे सांगताच ‘वॉरंट असेल तर दाखवा. मी अशा पद्धतीने बेकायदेशीररीत्या तुमच्यासोबत येणार नाही.’ हे त्यांनी योगींच्या पोलिसांना ठणकावले. त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली आहे असाच भास देशाला झाला,” असं राऊतांनी त्यांच्या रोखठोक या सदरात लिहिलं आहे.

 

First Published on: October 10, 2021 11:13 AM
Exit mobile version