लासलगावचे शासकीय कार्यालय अद्यापही सर्व्हर डाऊनच्या विळख्यात!

लासलगावचे शासकीय कार्यालय अद्यापही सर्व्हर डाऊनच्या विळख्यात!

प्रातिनिधिक फोटो

लासलगाव : येथील मुद्रांक व नोंदणी शुल्क कार्यालयातील बीएसएनलचे सर्व्हर डाऊनच असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून काम बंद पडले आहे. परिणामी, खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम झाला आहे. सर्व्हर बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असून, ते सुरू होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सर्व्हर बंद पडणे किंवा कमी गतीने चालणे यामुळे दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गेल्या चार दिवसांपासून तारांबळ उडत असून त्यांना तासन् तास रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारात खोळंबत दस्तनोंदणीची वाट पाहावी लागते आहे. एकीकडे देश ५-जी कडे वाटचाल करत असताना शासकीय कार्यालय अजूनही सर्व्हर डाऊनच्या विळख्यातच अडकलेले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शेतजमिनींच्या व्यवहाराचे प्रमाण वाढत आहे. अशातच जे व्यवहार सुरू आहेत. त्यातही ऑनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणार्‍या अनेकांचा त्यामुळे हिरमोड होतो. एका रजिस्ट्रीसाठी तासन् तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. महिन्यात अनेकदा सर्व्हर डाऊन रहात असल्याने अधिकारी वर्गाला काम करण्यात अडचणी येत आहेत. याकरिता योग्य व सक्षम पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याची ओरड नागरिक करत आहेत.

गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने दस्त नोंदणी थांबलेली आहे. याबाबत बीएसएनएलला तक्रार दिलेली असून त्याचा पाठपुरवठा सुरू आहे. 

– अभिजित देशपांडे, सबरजिस्टर, लासलगाव

बीएसएनएलचे सर्व्हर डाऊन रहात असल्याने दस्त नोंदणी काम करण्यात अडचणी येत आहे.एका कामासाठी तासंतास ताटळकत रहावे लागत आहे. या करिता पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.
– भानुदास बकरे, ग्रामस्थ, लासलगाव

First Published on: October 9, 2021 10:30 AM
Exit mobile version