अखेरचा हा तुला दंडवत…

अखेरचा हा तुला दंडवत…

गेली तीस वर्षे भारतीय नौदलाला सर्वाधिक सेवा देणार्‍या आयएनएस विराट या लढाऊ विमाने वाहून नेणार्‍या युद्धनौकेला शनिवारी अखेरचा निरोप देण्यात आला. खरंतर हा निरोप नव्हता. एका अभूतपूर्व कामगिरीला हा दंडवत होता… मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथून विराट गुजरातमधील अलंग येथे शेवटच्या प्रवासाला निघाले. त्यावेळी भारतीय नौदलाने मानवंदना देत विराटला निरोप दिला. नौदलाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमेत विराटने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. यामुळे भारतीय नौदलात विराटच उच्च स्थान आहे. प्रत्येक नौदल कर्मचार्‍याला विराटचा नुसताच अभिमान नाही तर त्याच्याशी जवळकीचं नातंही आहे. यामुळे विराटच्या निरोप समारंभात नौदलातील प्रत्येक कर्मचारी भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले.

विराटला भारतीय नौदलात ‘ग्रांड ओल्ड लेडी’ आणि मदर म्हणूनही संबोधले जाते. अलंग येथील श्रीराम ग्रुपने विराटला ३८.५४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. विराट हे भारतीय नौदलातील असे एकमेव लढाऊ विमाने वाहून नेणारे युद्धजहाज आहे ज्याने ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांच्या नौदलासाठी काम केले आहे. महाकाय विराटची लांबी २२६ मीटर असून रुंदी ४९ मीटर रुंद असलेल्या या युद्धनौकेचे वजन तब्बल २७,८०० टन एवढे आहे.

१९८४ मध्ये भारताने विराट विकत घेतले होते. त्यानंतर १ ९८७ साली भारतीय नौदलाच्या ताफ्यात त्याचा समावेश करण्यात आला. यावेळी आयएनएस विराट असे त्याला नाव देण्यात आले. आयएनएस विक्रांत बरोबर विराटची जोडी लावण्यात आली. १९९७ साली विक्रांत सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जवळ जवळ २० वर्षे विराटने एकट्याने भारताच्या समुद्रसीमांचे रक्षण केले.

आयएनएस विराटच्या नावावर अनेक विक्रम असून गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमधील जगातील सर्वाधिक सेवा देणार्‍या युद्धनौकांच्या यादीमध्येही त्याचा समावेश आहे.

ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात येण्याआधी विराट ब्रिटनच्या राजेशाही रॉयल नौदलात २५ वर्षे कार्यरत होते. एचएमएस हीर्मस नावाने त्याला संबोधले जायचे. यादरम्यान ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी याच जहाजावर आपले नौदल अधिकार्‍याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.

फॉकलँड युद्धातही ब्रिटिश नौदलातर्फे या जहाजाने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जुलै १९८९ मध्ये श्रीलंकेत शांती स्थापनेसाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ज्यूपिटरमध्येही या जहाजाने अभूतपूर्व भूमिका बजावली होती. २००१ साली झालेल्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन पराक्रममध्येही विराटने महत्त्वाची भूमिका बजावली. शनिवारी या विराट जहाजाला भारतीय नौदलाने मानाने गौरवले. यावेळी भारतीय ध्वजाबरोबर अनेक विमानांनी आकाक्षात घिरट्या मारत विराटला मानवंदना दिली. भारतीय नौदलाच्या इतिहासात विराटचे नाव अमर आहे. या भारतीय नौदलात विराट सेवा करणार्‍या या विराट जहाजाला मानाचा मुजरा.

First Published on: September 20, 2020 6:39 AM
Exit mobile version