बीडमध्ये लाव्हारसाचा उद्रेक नाही; तो व्हिडिओ दिशाभूल करणारा

बीडमध्ये लाव्हारसाचा उद्रेक नाही; तो व्हिडिओ दिशाभूल करणारा

बीड जिल्ह्यात लाव्हा रस बाहेर आल्यानंतर त्यांचे आताचे ताजे रुप

बीडमध्ये सध्या लोकसभेच्या प्रचाराचा लाव्हा पेटला आहे. त्यातच परळी येथील सिरसाळा गावात लाव्हारस सदृश पदार्थ जमिनीतून बाहेर येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यामुळे परळी आणि बीडमध्ये या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता या व्हिडिओतील सत्य समोर आले आहे. बाजूला असलेल्या विजेच्या खांबातून उतरलेल्या करंटमुळे जमिनीतून विशिष्ट पदार्थ बाहेर आला, तो लाव्हारस नसल्याचे महावितरणचे सिरसाळा येथील अधिकारी नामदेव सुतार यांनी स्पष्ट केले.

सिरसाळा येथे लाव्हारस सदृश पदार्थ बाहेर पडत असताना काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला होता. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी सिरसाळा येथे प्रचंड गर्दी केली होती. तसेच स्थानिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती.

“सदरील व्हिडिओत दिसणारा लाव्हारस नसून तिथेच बाजूला असलेल्या ११ केव्हीच्या खांबामध्ये करंट उतरल्याने तो करंट खडकाळ जमिनीत जाऊन रिटर्न करंट तयार झाला आणि त्यातून तयार झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे हा लाव्हारस सदृश पदार्थ तयार होऊन बाहेर पडला. यात भिण्यासारखे काही नाही”, असे चंद्रकांत गायकवाड यांनी म्हटले आहे. चंद्रकांत गायकवाड हे माजलगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून पर्यावरणप्रेमी आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत सत्य जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचे ताजे फोटो देखील आपल्या फेसबुकवर शेअर केले आहेत.

 

First Published on: April 15, 2019 3:10 PM
Exit mobile version