शिहूची उरलेली भातशेतीही धोक्यात !

शिहूची उरलेली भातशेतीही धोक्यात !

रिलायन्स उद्योग समुहाच्या येथील नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (एनएमडी) या महाकाय कारखान्यातून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइनला पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटिवली, गांधे भागात गळती लागली आहे. त्यामुळे पावसाने केलेल्या धुळधाणीनंतर काही अंशी उरलेली भातशेती आता पूर्णपणे नष्ट होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

कारखान्यातील रसायनमिश्रित दूषित पाणी समुद्रात नेण्यासाठी १५ ते २० किलोमीटर अंतरावरील धरमतर खाडीपर्यंत बहुतांशी मार्गातील शेतांतूनच पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन जीर्ण झाली असल्याने अनेकदा फुटते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यावर्षी सुरुवातीच्या मुसळधार आणि नंतरच्या अवकाळी पावसामुळे तयार झालेले भाताचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेलेेले आहे. आता उरलेसुरले पीकसुद्धा पाइपलाइन फुटल्याने भिजले आहे. याचा फटका आटिवलीतील ठकीबाई हिरू पाटील, विठाबाई रामदास पाटील, शांताराम गोविंद पाटील, बाळाराम पदू पाटील, दामोदर कमळ्या म्हात्रे, यशवंत अंबाजी गदमळे आणि गांधे गावातील हिराचंद्र हाशा गदमळे, लता देवराम गदमळे, भाऊ रामा गदमळे या शेतकर्‍यांना बसला आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार पाइपलाइनमधून रात्रीच्या वेळी उच्च दाबाने सांडपाणी सोडले जात असल्यामुळे ते शेतात पसरते. ही सांडपाणी वाहिनी अनेकदा फुटत असल्याने शेती नापीक व्हायची वेळ आली आहे. गळती झाल्यानंतर कारखान्याकडून तुटपुंजी नुकसानभरपाई दिली जात असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे मोकल यांनी सांगितले. शेतात असणार्‍या तलावातील मासेसुद्धा दूषित पाण्यामुळे मृत झाल्याचे एका शेतकर्‍याने सांगितले.

कापून ठेवलेले पीक बाहेर काढण्यासाठी शेतात जाणे गरजेचे आहे. मात्र शेतात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे अंगाला खाज सुटणे, फोड येणे असे प्रकार घडत असल्याने राहिलेले पीकही डोळ्यासमोर नाहीसे होणार की काय, अशी चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. या सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय काही शेतकर्‍यांनी घेतला आहे. या संदर्भात एनएमडीच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याशी वारंवार भ्रमणध्वनीवर प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, त्याने भ्रमणध्वनी शेवटपर्यंत उचलला नाही.

First Published on: November 13, 2019 1:53 AM
Exit mobile version