खालापुरात बिबट्याचा लपंडाव सुरूच!

खालापुरात बिबट्याचा लपंडाव सुरूच!

तालुक्यात नावंढे गावात गेल्या सोमवारी भरदिवसा दर्शन दिलेल्या बिबट्याचा लपंडाव सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी पुन्हा ४ किलोमीटर अंतरावरील केळवली गावाच्या शिवारात बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांनी वन विभागाला कळविले आहे.
नावंढे गावात बिबट्या दिसल्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होते. परंतु पावसाळ्यात माजलेल्या रानामुळे बिबट्या पसार झाला. जाताना मागे ठेवून गेलेल्या पायाच्या ठशांमुळे तो साधारण साडेतीन ते चार वर्षांचा असल्याची खात्री पटली आहे. नावंढेतून बिबट्याने हुलकावणी दिल्यानंतर पनवेलच्या नेरे परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली आहे. खालापूर आणि पनवेल तालुक्याला जोडणारा माची प्रबळगड डोंगर आहे. नावंढे भागातून गेलेला बिबट्या यामार्गे सहज पनवेल हद्दीतील नेरे हद्दीत जाऊ शकतो.

प्रबळगड माची उतरल्यानंतर पायथ्याशी नेरे गाव असून, मोरबा धरणालगत हा परिसर आहे. तसेच नेरे भागात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला असल्याची माहितीदेखील नेरे ग्रामस्थ संतोष फडके यांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी बिबट्या पुन्हा येईल ही शक्यता खरी ठरली. केळवली गावाच्या शिवारात बिबट्याचे दर्शन काही शेतमजुरांना झाले. घाबरलेल्या शेतमजुरांनी गावात माहिती सांगितल्यानंतर वनपाल व्ही. आर. नागोठकर आणि कर्मचार्‍यांनी केळवली येथे धाव घेतली. बिबट्याच्या या लपंडावाने दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

बिबट्या दिवसाला 30 किलोमीटर अंतर सहज पार करू शकतो. नावंढे भागातील बिबट्या नेरे भागात गेल्याची शक्यता असून, वन विभाग माहिती घेत आहे. बिबट्याने अजून कोणावर हल्ला केल्याची माहिती नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या नागपूरस्थित मुख्यालयातून परवानगी घ्यावी लागते. खालापूर वन विभागाकडे पिंजरा, जाळी आवश्यक साहित्य असून, नागरिकांनी सतर्क राहावे.
-आशिष पाटील, मुख्य वन क्षेत्रपाल, खालापूर

केळवली गावाच्या शिवारात पंजाचे ठसे घेतले आहेत. नावंढे गावातील ठसे यापेक्षा आकाराने मोठे वाटत आहेत. माणकिवली भागातील पोल्ट्रीधारकांना कोंबड्यांचा शिल्लक कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. ग्रामसेवकांनादेखील गावातील कचरा उघड्यावर टाकण्यावर निर्बंध घालण्याची सूचना देण्यात आली आहे.
-व्ही. आर. नागोठकर, वनपाल, खालापूर

First Published on: November 16, 2019 1:58 AM
Exit mobile version