लेखणी आणि अमोघ वाणीच्या शस्त्राने हे दडपण युग नष्ट करूया, संजय राऊतांचे आवाहन

लेखणी आणि अमोघ वाणीच्या शस्त्राने हे दडपण युग नष्ट करूया, संजय राऊतांचे आवाहन

मुंबई : सध्या दडपण युग आहे. प्रत्येकावर दडपण आहे. विरोधात बोलले की समन्स येतो. विरोधकांचा गळा घोटण्याचे काम केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहेत. देश, महाराष्ट्र अशा थराला कधी गेला नव्हता आणि गेला असेल तर तो दुरुस्त करण्याचे काम लेखक, पत्रकार, विचारवंतांनी करायचे आहे. लेखण्या आणि अमोघ वाणीच्या शस्त्राने हे दडपण युग नष्ट करूया, असे आवाहन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांच्या झेंडूची झुले (विडंबनात्मक काव्यसंग्रह) आणि घसरगुंडी (हास्यव्यंग लेखसंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे शनिवारी हा सोहळा रंगला. यावेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ‘मार्मिक’ चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, शलाका प्रकाशनचे भाऊ कोरगावकर आणि स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे उपस्थित होते. या पुस्तकाच्या निमित्ताने स्वामीराज प्रकाशनाने प्रकाशन व्यवसायात पदार्पण केले आहे.

मी साडेतीन महिने तुरुंगात होतो. त्यानंतरचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे. तुरुंगात फक्त भिंती दिसत होत्या. एकांतात पुस्तक हाच सोबती असतो. स्वातंत्र्याच्या काळात लेखक- कवींनी जी क्रांती केली, त्यात विडंबन, विनोद लेखन मोठे शस्त्र होते. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 40 वर्षे काम केले. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा त्यांच्याकडून घेतला आहे. मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी लढत राहिले पाहिजे, असे सांगून, लिहिणाऱ्यांचा हात धरता येणार नाही, आमच्यासारख्यांची तोंडं धरता येणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावले.

मराठी भाषेबद्दल वाटणारी चिंता रास्त आहे. पण आजही मराठीतल्या मोठया वर्गाला वाचल्याशिवाय करमत नाही. जोपर्यंत मशाल आहे, तोपर्यंत मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र पेटलेला राहील, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या काळात राजकारण, सिनेमा याच्या पलीकडे लोकांना फारसे संदर्भ माहीत नाही. अशा काळात लिहायचे आणि वाचकांना वाचायला लावायचे, हे कसब आहे. डॉ. केळुसकर यांच्या डोक्यात लेखनाची चौकट परफेक्ट असते. त्या चौकटीला ते वास्तवाचा, वर्तमानाचा सुंदर मुलामा देतात, हे सोपे काम नाही, त्यांची जोरदार बॅटींग सुरू आहे, अशा शब्दांत श्रीकांत बोजेवार यांनी केळुसकर यांच्या लेखनाचे कौतुक केले.

आजकाल एखाद्या विचारधारेविरुद्ध लिहिले की देशद्रोही ठरता. केळुसकर हे भूमिका घेणारे कवी आहे. राजकीय, सामाजिक भूमिका घेऊन त्यावर ठाम राहतात आणि मिठासपणाने ते सगळे पुढे घेऊन जातात, अशी टिप्पणी मुकेश माचकर यांनी केली.

मॅड लोकांमध्ये राहतोय की काय…
अशोक नायगावकर यांनी त्यांच्या खास नायगावकरी, वगैरे वगैरे शैलीत सध्याच्या मॅड वातावरणावर बोट ठेवलं. त्याचबरोबर मराठीच्या भवितव्याविषयी पोटतिडकीने चिंता व्यक्त केली. ‘सध्या चेष्टा युग सुरू आहे. मॅड लोकांमध्ये राहतो की काय असं वाटावं, असा काळ आहे. जीवनाचा चोथा झालाय की काय असं अवतीभोवती विडंबन झाले आहे. तोंडातून चुकून एखादा शब्द गेला की भीती वाटते. दडपण येते. या ‘मॅडनेस’कडून पुन्हा ट्रॅकवर आणण्याचे काम कवी- लेखक, सर्जनशील लोक करतील, असे नायगावकर म्हणाले.

दर महिन्याच्या 27 तारखेला मराठी आठव दिवस उपक्रम साजरा होत आहे. हे खरेच कौतुकास्पद आहे. खरे तर, मराठीचे दोषी आपण आहोत. ही नवी पुस्तके वाचनालयात जातील पण पुढे काय? घरात वाचली जातील का? मूळ गाणी, कवी कोण, हेच तर नव्या पिढीला माहीत नसेल तर या सृजनाचे पुढे काय करायचे? आधी घरातले ग्रंथालय टिकवले पाहिजे. बोलीभाषा जगल्या पाहिजेत. हे सगळे पुन्हा नव्याने उभे राहिले पाहिजे, असे नायगावकर म्हणाले.

First Published on: November 22, 2022 9:33 PM
Exit mobile version