मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना देखील आला धमकीचा फोन!

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना देखील आला धमकीचा फोन!

शरद पवार यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर आलेल्या धमकीच्या फोनची चौकशी आत्ता कुठे सुरू झालेली असतानाच आता अजून एका मोठ्या नेत्याला धमकीचा फोन आलेला आहे. आणि हा मोठा नेता म्हणजे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेला आहे. हा फोन भारताबाहेरून आला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यासोबतच शरद पवारांप्रमाणेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील अशाच प्रकारे धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. कंगणा रनौत प्रकरणी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यावरून ही धमकी आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांचं काम अधिकच वाढलं असून या धमकी प्रकरणाभोवतीचं गूढ देखील वाढू लागलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हे धमकी देणारे फोन आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीसोबतच वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील धमकीचा फोन आल्याची माहिती देखील समोर येत आहे. कालच मुख्यमंत्र्यांसोबतच शरद पवारांना देखील धमकीचा फोन सिल्व्हर ओकवर गेला होता. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेला धमकीचा फोन मात्र देशातूनच आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. हे प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी, तसेच यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिली.

First Published on: September 7, 2020 2:58 PM
Exit mobile version