अखेर महाराष्ट्रातही घरपोच दारूविक्री सुरू; ‘या’ जिल्ह्यापासून सुरुवात!

अखेर महाराष्ट्रातही घरपोच दारूविक्री सुरू; ‘या’ जिल्ह्यापासून सुरुवात!

लॉकडाऊन ३.०मध्ये कंटेनमेंट झोन वगळता ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोममधील इतर भागात मद्यविक्रीला परवानगी दिली. मात्र, त्याचा लगेचच परिणाम दिसून आला असून अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचं चित्र देशात अनेक ठिकाणी दिसलं. नाशिक आणि मुंबईत तर लगेचच ही मद्यविक्री पुन्हा बंद करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे पंजाब सरकारने बुधवारी घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली. त्यामुळे दुकानांवर होणारी गर्दी टाळता येणार असून मद्यविक्रीतून येणारी कराची रक्कम देखील राज्याच्या तिजोरीत जमा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अशा प्रकारे घरपोच मद्यविक्रीची मागणी केली जात होती. अखेर त्याला सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात अशा घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

गुगल फॉर्म, मोबाईल, व्हॉट्सअॅपवर ऑर्डर!

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हे आदेश देणारं परिपत्रक बुधवारी काढलं आहे. या आदेशांनुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या एफएल २, सीएलएफएलटिओडी ३ आणि एफएलबीआर २ या किरकोळ दारूविक्री परवानाप्राप्त दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सीलबंद मद्याची विक्री ग्राहकाला घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, मद्याची ऑर्डर देण्यासाठी दुकानदारांनी गुगल फॉर्म, दूरध्वनी, मोबाईल, व्हॉट्सअॅप किंवा वैयक्तिक मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असं देखील सांगण्यात आलं आहे. या आदेशांचं पालन करूनच दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

घरपोच मद्यविक्रीचे नियम आणि अटी…

१) दुकानाच्या दर्शनी भागात मोबाईल क्रमांक, गुगल फॉर्मची लिंक, व्हॉट्सअॅप क्रमांक इत्यादी माहिती मोठ्या अक्षरात लिहिलेला फलक लावावा

२) ग्राहकांना मद्यविक्रीची सेवा घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी

३) अधिकृत किंवा जबाबदार व्यक्तीची माहिती देऊन घरपोच मद्य पुरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांकडून पास घ्यावा

४) मद्यविक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खात्री करावी

५) मद्याच्या किंमतीमध्ये एमआरपीवर वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी

६) महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९च्या तरतुदी भंग होणार नाही, याची दक्षता सर्व विक्रेत्यांनी घ्यावी.

दरम्यान, सध्या ऑनलाईन वस्तूंची खरेदी किंवा मद्यखरेदीच्या नावाने मोठ्या प्रमाणावर पैशांची फसवणूक होत असल्याची प्रकरणं समोर येत असल्यामुळे घरी मद्याची डिलिव्हरी आल्यानंतरच त्याचे पैसे चुकते करावेत, असं आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा – दुकानांवर तोबा गर्दी; आता दारू मिळणार घरपोच!
First Published on: May 7, 2020 1:07 PM
Exit mobile version