Lok Sabha 2024 : अमित शहांच्या सभेला परवानगी दिल्याने बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद

Lok Sabha 2024 : अमित शहांच्या सभेला परवानगी दिल्याने बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद

अमरावती : प्रचार सभेच्या मैदानावरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. सभेसाठी परवानगी दिल्यानंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे बच्चू कडू संतापले आहेत. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला होता. यावेळी पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (Lok Sabha Election 2024 Dispute between Bachchu Kadu and Police after allowing Amit Shah’s meeting)

प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचार सभेसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमधील सायन्स कोर मैदान 24 एप्रिलसाठी बुक केले होते. त्यासाठी त्यांनी संबंधित शुल्कही भरले. मात्र आज मैदानाची पाहणी करण्यासाठी जात असताना बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखले. यावेळी संतापलेले बच्चू कडू म्हणाले की, अमित शाह यांच्या सभेला परवानगीची गरज नाही. पण सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेला परवानगी कशी नाकारता? असा सवाल करत बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : नाशिकचा तिढा सुटता सुटेना; भुजबळ म्हणतात, राष्ट्रवादीचा दावा आजही कायम

बच्चू कडू माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही मैदानासाठी 5 एप्रिलला अर्ज केला होता. त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज केला. त्यानंतर आम्हाला 18 एप्रिलला या जागेची परवानगी मिळाली. आमच्याकडे प्रशासनाच्या परवानगीची कागदपत्रे आहेत. आम्हाला 23 आणि 24 एप्रिलला सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 21 आणि 22 तारखेसाठी परवानगी मिळाली होती. आम्हाला परवानगी असूनही इथे येण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे. दोन दिवसांसाठी मैदानावर इतर कोणाचाही कार्यक्रम किंवा सभा होऊ नये अशी आमची मागणी होती. मात्र असे असताना त्याच मैदानावर भाजपा उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. यासाठी भाजपाने तयारीही सुरू केली आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हा तर भाजप पुरस्कृत…; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला

Edited By – Rohit Patil

First Published on: April 23, 2024 4:42 PM
Exit mobile version