घरदेश-विदेशLok Sabha 2024 : हा तर भाजप पुरस्कृत...; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला...

Lok Sabha 2024 : हा तर भाजप पुरस्कृत…; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला

Subscribe

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून प्रचार गीतातील दोन शब्द काढण्याची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले. त्यानंतर आता उद्धव गटाने भाजपावर 'सामना'मधून निशाणा साधला आहे. तसेच आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच प्रचारासाठी तयार केलेले मशाल गीत प्रसिद्ध केले. त्यांच्या या मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द काढून टाकावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून प्रचार गीतातील दोन शब्द काढण्याची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे संतापले. त्यानंतर आता उद्धव गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. तसेच आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. (Lok Sabha Election 2024 uddhav thackeray group slams election commission over hindu and bhavani word in song)

आयोग निष्पक्ष राहिलेला नाही

देशाचा निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरण्यातच स्वतःला धन्य धन्य मानीत आहे. शिवसेनेच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून त्यांनी ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे फर्मान सोडले आहे. एका बाजूला भयग्रस्त भाजप पराभवाच्या भीतीने सर्वच देवदेवतांना प्रचारात उतरवीत आहे. स्वतः नरेंद्र मोदी हे ‘राम राम’ करत प्रचार करीत फिरत आहेत. रामलल्लाच्या फुकट दर्शनाची लालूच मतदारांना अमित शहा दाखवीत आहेत. प. बंगालसारख्या राज्यात भाजपचे नेते सरळ सरळ हिंदुत्वाचा प्रचार करीत असताना भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगास शिवसेनेच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’, ‘हिंदुत्व’ शब्दांची अडचण व्हावी यास काय म्हणावे? असा प्रश्न विचारतानाच पराभवाची भीती वाटते, म्हणून असा निर्णय घेता का, असा टोला देखील सत्ताधाऱ्यांना लगावण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हा तर नकली हिंदुत्वाचा पराभव; ठाकरे गटाचा भाजपाला टोला

आचारसंहितेचे उल्लंघन कुठे?

महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीस ‘अटकाव’ करण्याचे पाप भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाने केले. शिवसेनेचे परंपरागत धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मिंधे गटास दिले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस मशाल चिन्ह मिळाले. या ‘मशाल गीता’मुळे भाजप आणि त्यांच्या मिंध्यांची बोलती बंद झाली, पण निवडणूक आयोगाला पुढे करून त्यांनी ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ या ओळींवर आक्षेप घेतला. त्यामुळे धार्मिक प्रचार होतो, असे भाजपचा निर्वाचन आयोग म्हणतो. खरे तर या गीतात फक्त भवानी मातेचा उद्घोष केला आहे. शिवसेनेस मते द्या, असे सांगितले नाही. त्यामुळे आचारसंहिता आडवी आली कोठे? अमित शहा रामलल्लाच्या मंदिरावर मते मागतात. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा उल्लेख वारंवार आहे. भाजपला मते द्या, रामलल्लाचे फुकट दर्शन घडवू, असे जाहीर सभांतून भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. यावर निवडणूक आयोगाचा आक्षेप नाही.

- Advertisement -

आता निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म, राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही? मोदी यांनी कर्नाटकच्या निवडणुकीत ‘बजरंगबली’च्या घोषणा दिल्या, बजरंगबलीचे नाव घेऊन भाजपचे बटण दाबा, असे सांगितले. श्रीराम, बजरंगबली यांच्या नावाने मते मागणे हा अपराध आहे, पण हे अपराध पोटात घालून भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रचार गीतातील ‘हिंदुत्व’ आणि ‘भवानी माते’वर आक्षेप घेतला. भाजपच्या नकली हिंदुत्वाचा हा पराभव आहे. ‘हिंदू हा तुझा धर्म’ म्हणण्यात गैर काय? भाजपने याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. भवानी माता ही राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. भवानी माता ही छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आहे. भवानी मातेने देशाच्या शत्रूंचे निर्दालन करण्यासाठी शिवरायांच्या हाती तलवार दिली. या तलवारीशी सामना करणे भाजपला जमणार नाही. त्यामुळे भवानी मातेवर बंदी घालण्याचे नीच कारस्थान हाणून पाडले पाहिजे, असेही उद्धव गटाने सुनावले आहे. (Lok Sabha Election 2024 uddhav thackeray group slams election commission over hindu and bhavani word in song)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -