Lok Sabha 2024 : हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

Lok Sabha 2024 : हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रितसर पैसे भरून परवानगी घेत अमरावतीतील सायन्सकोर मैदान बूक केले होते. पोलिसांनीही बच्चू कडूंना प्रचारासाठी मैदानाची परवानगी दिली होती. मात्र अचानक ही परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली. या सगळ्या प्रकरणावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत महायुतीतील भाजपच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 due to possible of Hindu Muslim riots we go back Bacchu Kadu)

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“काल (23 एप्रिल) आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता. याबाबत माहिती मिळाली होती. आम्हाला भीती आहे की, 26 एप्रिल किंवा उद्या, परवा हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते. अशा खालच्या पातळीवर येऊन त्यांची निवडणूक जिंकण्याची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे घेतली. आमच्या कार्यकर्त्यांनीही त्याला पाठिंबा दिला. रात्रीच्या रात्रीत 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. पण आम्ही माघार घेतली”, असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले…, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“आम्हाला 23 आणि 24 एप्रिलसाठी मैदानाची परवानगी मिळाली होती. पण आमचा प्रचार पोलिसांनी अडवला. ज्या पोलीस आयुक्तांनी आमचा प्रचार अडवला ते स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत. आधी आम्हाला सांगितले की तुम्हाला परवानगी आहे. त्यानंतर 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आम्हाला सांगतात की, तुम्हाला परवानगी नाही. जर कायद्याचे पालन तुम्हालाच करायचे नसेल तर तुम्ही कशाला निवडणूक ठेवली, पोलीस आयुक्तांपासून कलेक्टर सर्वांनी आमचा प्रचार थांबवला. मग बटण सुद्धा त्यांनीच दाबावं”, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केला.

रवी राणांना बच्चू कडूंचा इशारा

बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांत येण्यासाठी अशी नौटंकी करत आहेत, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना बच्चू म्हणाले की, “पैशाने सर्व विकत घेता येत नाही. तुम्हाला पैशाची मस्ती आहे. तुम्ही प्रत्येका पैशानी विकत घेता. यापुढे असं बोलल्यास सोडणार नाही”, असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार; राहुल गांधी आणि अमित शहा आज पश्चिम विदर्भात

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 24, 2024 8:44 AM
Exit mobile version