Lok Sabha 2024 : नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ…; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Lok Sabha 2024 : नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ…; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपा प्रवेश करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी खडसेंनी भाजपातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता खडसे भाजपात प्रवेश करणार असून त्यांनी याबाबत स्वत: माहिती दिली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एकनाथ खडसे यांच्यावर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ आली असावी’, असे शरद पवार म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Talk About Eknath Khadse Join Bjp)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज (20 एप्रिल) जळगाव दौऱ्यावर असताना त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबच्या भूमिकेवर भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“राज्यात याआधी कधीच कोणावर व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. पण सध्या व्यक्तिगत टीका केली जात आहे. या टीकांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. कदाचित ही वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी. असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे”, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाही तर…; फडणवीसांचा हल्लाबोल

याशिवाय, एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “मला याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना माहीत असेल. ते संघटनेचे काम पाहतात. या भागात ज्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा लौकीक आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे सुद्धा आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू”, असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मविआची ताकद वाढली, शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 21, 2024 6:21 PM
Exit mobile version