Lok Sabha 2024 : नाशिकचा उमेदवार कधी जाहीर होणार? गिरीश महाजनांचे मोठे विधान

Lok Sabha 2024 : नाशिकचा उमेदवार कधी जाहीर होणार? गिरीश महाजनांचे मोठे विधान

नाशिकचा उमेदवार कधी जाहीर होणार? गिरीश महाजनांचे मोठे विधान

नाशिक : महायुतीचा पाच ते सहा जागांवरील तिढा आता सुटताना पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी (ता. 30 एप्रिल) दिवसभरात शिवसेना शिंदे गटाकडून दोन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबई लोकसभेतून यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही नाशिक लोकसभेतून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. पण, याबाबत आता भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी जाण्याआधी महाजनांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक लोकसभेबाबतची माहिती दिली. (Lok Sabha Election 2024 Girish Mahajan big statement about announcing Nashik constituency candidature)

प्रसार माध्यमांसमोर भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरायला अजून दोन दिवस बाकी आहेत. उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसले तरी आम्ही सर्व तयारी करुन ठेवली आहे. नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते 02 तारखेला अर्ज भरण्यासाठी येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उमेदवारी जाहीर होण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र, त्यामुळे काही फरक पडणार नाही, असे महाजनांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : सांगलीत प्रकाश आंबेडकरांनी पारडे बदलले; शेंडगेंना सोडल्यानंतर या उमेदवाराला पाठिंबा

तसेच, एका-एका मतदारसंघामध्ये 25-25 हजार कार्यकर्त्यांची टीम तयार आहे, त्यामुळे आमची तयारी नाही असे अजिबात नाही. नावाला आमच्याकडे काहीही महत्त्व नाही. उमेदवारीसाठी नाव कोणाचेही जाहीर होऊ द्या, आम्ही महायुतीचे काम करणार आहोत. आमचा अंतिम उद्देश हा उमेदवार निवडून आणणं हाच आहे. आम्ही सर्वांनी 400 पारचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. अशी माहिती भाजपा नेते गिरीश महाजनांकडून देण्यात आली आहे.

तर, महायुती उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकेल, असा आमचा ठाम विश्वास आहे. पण नाशिक लोकसभेतून कोणाला उमेदवारी जाहीर करायची, याबाबत आमचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आमच्याकडे वाटाघाटी असते. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, त्यामध्ये एखादी जागा इकडे तिकडे होत असते. त्यामुळे मला याबाबत आज सांगणे कठीण आहे. मात्र, उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल, असे महत्त्वाची माहिती गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बुधवारी (ता. 01 मे) दुपारी महायुतीकडून नाशिक लोकसभेतून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मोदींना पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी करायचंय का? सुषमा अंधारेंचा महायुतीवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी नाशिकच्या जागेवरून उमेदवारी जाहीर करण्यात अडचण का येत आहे? याबाबत बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की, आमचे तीन-चार पक्ष एकत्र आहेत. वाटाघाटीमघ्ये कोणती जागा कोणाला, कोणी किती जागा घ्याव्या, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत कोणती अडचण आहे, असा कोणताही भाग नाही. आज दक्षिण मुंबईची जागा जाहीर झाली. पाच ते सहा जागा अशा आहेत की, त्यामध्ये कोणती जागा कोणी घ्यावी, यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यामुळे येथील उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल, त्यानंतर आम्ही सर्व एकदिलाने काम करू, असेही गिरीश महाजन म्हणाले.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 30, 2024 8:55 PM
Exit mobile version