MVA : महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर, मात्र मुंबईतील दोन जागांसह 7 मतदारसंघात उमेदवारांची शोधाशोध

MVA : महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर, मात्र मुंबईतील दोन जागांसह 7 मतदारसंघात उमेदवारांची शोधाशोध

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सात जागेंवर अजून उमेदवार मिळाले नाही

मुंबई – महाविकास आघाडीचे जागा वाटप आज जाहीर करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या नरिमन पाँईट येथील कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट – 21, काँग्रेस – 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाची घोषणा झाली, निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे अजुनही सात जागांवर उमेदवार ठरत नाही अशी स्थिती आहे.

उमेदवार जाहीर करण्यात महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख दोन आघाड्यांमध्ये सर्वात आघाडीवर राहिली ती ठाकरेंची शिवसेना. त्यांनी 21 उमेदवार आधीच जाहीर केले. अधिकृत जागा वाटपाची घोषणा आज त्यांच्याच कार्यालयातून काँग्रेस नेते आणि शरद पवारांच्या उपस्थितीत करण्यात आली. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन आणि चार जागांवर उमेदवार मिळालेले नाहीत.

काँग्रेसकडून चार जागांवर उमेदवारांचा शोध

1) मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. येथे काँग्रेसला अजून उमेदवार मिळालेला नाही. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने येथून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. मातोंडकरांचा येथे मोठ्या फरकाने पराभव झाला होता. यंदा काँग्रेसचे संजय निरुपम येथून निवडणूक लढण्यास इच्छूक होते. मात्र त्यांची पक्षविरोधी कारवाया करत असल्याचे सांगत सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस येथे आता उमेदवाराचा शोध घेत आहे.

2) मुंबई उत्तर मध्य
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात देखील काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशीच स्थिती आहे. काँग्रेस येथे उमेदवारांची चाचपणी करत आहे. या जागेसाठी आतापर्यंत अभिनेत्री स्वरा भास्कर, राज बब्बर आणि नसीम खान यांचे नाव समोर आले होते. मात्र अजुनही एका नावावर काँग्रेस नेत्यांचे एकमत झालेले नाही.
दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढवणार की शिंदे गट यावर एकमत झालेले नाही. त्यामुळे दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये मुंबई उत्तर मध्यचा तिढा कायम आहे.

3) जालना
काँग्रेसच्या वाट्याला आलेली तिसरी जागा जालना लोकसभा मतदारसंघ. काँग्रेस येथे गेल्या पाच पंचवार्षिकपासून पराभूत होत आली आहे. भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे येथून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. पाच वेळा त्यांनी या मतदार संघात विजय मिळवला आहे. त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची या प्रश्नाचे उत्तर अजून काँग्रेस नेतृत्वाला मिळालेले नाही. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र कल्याण काळे यांचा संपूर्ण जालना मतदारसंघात खरोखर संपर्क आहे का? फुलंब्री आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघापलिकडे त्यांची ओळख आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

4) धुळे
उत्तर महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरेंना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात कोणाला मैदानात उतरवायचे हा काँग्रेससमोर प्रश्न आहे. पाचव्या टप्प्यात, 20 मे रोजी येथे मतदान होणार आहे. काँग्रेसने येथे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव पुढे आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचीही नावे इच्छूक म्हणून समोर आली. अद्याप पक्ष श्रेष्ठींनी कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेला नाही.

हेही वाचा : MVA LIVE : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला! सांगली ठाकरे तर भिवंडी शरद पवारांकडेच

राष्ट्रवादीचे तीन जागांवर घोडे अडले

5) सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघ सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आधी उदयनराजे भोसले आणि ते भाजपसोबत गेल्यानंतर श्रीनिवास पाटील येथून विजयी झाले. शरद पवारांची 2019 मधील पावसातील ऐतिहासिक सभा याच मतदारसंघात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे राष्ट्रवादीला नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

6) रावेर
भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांनी ऐन निवडणुकीच्या काळात पुन्हा स्वगृही परतण्याची तयारी सुरु केली आहे. शरद पवारांनी त्यांनाच रावेरमधून उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र आता त्यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. खडसेंची कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटात सक्रीय आहेत. वहिणी रक्षा खडसेंविरोधात आता पवार नणंदेला तिकीट देतात का, याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील ही दोन नावेही इच्छूकांच्या यादीत आहेत. भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे विरोधात शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याची उत्सूकता आहे.

7) माढा
या मतदारसंघात शरद पवार मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ती खेळी पूर्ण होण्यापूर्वी चर्चाच अधिक झाल्यामुळे पवारांवरच डाव उलटला. भाजप सोबत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा देण्याची तयारी शरद पवारांनी केली होती. मात्र भाजपने जानकरांना परभणीतून उमेदवारी देऊन पवारांचे मनसुबे धुळीस मिळवले.
भाजपने येथून विद्यामान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना महायुतीमधून विरोधही होत आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांकडे आहे. जानकर परभणीत गेल्यानंतर आता पवार आणखी एका भाजप नेत्यावर डाव लावण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पवार गटाकडून चर्चेत आहे. मोहित घराण्याला तिकीट मिळाले नसल्यामुळे त्यांची नाराजी आहे. मोहित पाटील हे पूर्वी शरद पवारांच्यासोबतच काम करत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला तर ते स्वगृही परतले असेच म्हणता येईल. याशिवाय अनिकेत देशमुख, अभयसिंह जगताप यांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे.

First Published on: April 9, 2024 4:35 PM
Exit mobile version