Lok Sabha 2024 : बारामतीत पवारांनाच निवडून आणा; अजित दादांच्या आवाहनाने पिकला हशा

Lok Sabha 2024 : बारामतीत पवारांनाच निवडून आणा; अजित दादांच्या आवाहनाने पिकला हशा

अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी

बारामती (पुणे) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीने आज त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडल्याचे जाहीर केले. येथून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आहेत. नणंद – भावजयमधील या सामन्याला आता रंग चढायला लागला आहे. अजित पवार हे आज बारामतीत होते. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेतही त्यांनी हजेरी लावली आणि यंदा पवारांच्या सुनेला संधी द्या, अशी मागणी बारामतीकरांकडे केली आहे. पवार विरुद्ध सुळेंच्या या प्रचारात भाऊबंदकीही दिसून येत असल्याचे अजित पवार म्हणाले.

आता सुनेला संधी द्या- अजित पवार

बारामतीकरांसमोर यंदा बाका प्रसंग निर्माण झाला आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांना साथ दिली आहे. 1991 साली मुलाला म्हणजे अजित पवारांना निवडून दिले. त्यानंतर वडिलांना – म्हणजे शरद पवारांना विजयी केले. त्यानंतर तीन टर्म मुलीला – म्हणजेच सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी निवडून दिले. आता सुनेला संधी द्या. म्हणजे सगळंच फिट्टमफाट होईल. सगळे खुश होतील. तुम्हीही खुश, असे म्हणताच लोकांमध्ये हशा पिकला.

बारामतीत भाऊबंदकी उघड, अजितदादा म्हणाले- तोंड उघडायला लावू नका!

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीय गावागावात फिरत आहेत. यापूर्वी श्रीनिवास पवारांचा एक व्हिडिओ देखील समोर आला, ज्यामध्ये त्यांनी वयस्कर काकांचा अपमान करणारे माझ्या दृष्टीने नालायक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अजित पवार कोणाचेही नाव न घेता म्हणाले, की आता सगळेच फिरत आहेत. माझे भावंडीही पायाला भिंगरी लावून फिरायला लागले. एवढी वर्षे मी निवडणूक लढवत आलो पण तेव्हा कोणी प्रचारात उतरले नाही. आता सगळेच बाहेर पडले आहेत. गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यातील छत्र्यांसारखे उगवले, असा टोलाही त्यांनी भावंडांना लगावला. तसेच, मला तोंड उघडायला लावू नका, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : Thackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच दिवसांनंतर देशाने पाहिला – उद्धव ठाकरे

पुन्हा एकदा पवारांवर निशाणा

बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना होत आहे. शरद पवारांच्या उमेदवार सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आहेत. शरद पवारांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, 80 टक्के आमदार माझ्यासोबत आले आहेत. ते काही मी त्यांना पैसे दिले म्हणून आलेले नाहीत. तुम्ही दरवेळेस भूमिका बदलता. 2014 मध्ये सांगितलं भाजपला पाठिंबा द्यायचा, आम्ही दिला. मग तुम्ही सांगता नाही द्यायचा, आम्ही मागे फिरलो. 2019 मध्ये पुन्हा तुम्ही सांगता आपल्याला सोबत जायचे आणि परत शब्द बदलता.

बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. अजित पवारांच्या उमेदवाराला विरोधी पक्षासोबतच महायुतीतील शिवसेनेचे विजय शिवतारे यांनाही आव्हान दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर त्यांचे बंड थंड झाले आहे. आता थेट लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काका-पुतण्यात होत आहे.

हेही वाचा : MVA : महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर, मात्र मुंबईतील दोन जागांसह 7 मतदारसंघात उमेदवारांची शोधाशोध

First Published on: April 9, 2024 7:42 PM
Exit mobile version