Lok Sabha 2024 : निलेश लंकेंची राजकीय खेळी, राळेगणसिद्धीत घेतली अण्णा हजारेंची भेट

Lok Sabha 2024 : निलेश लंकेंची राजकीय खेळी, राळेगणसिद्धीत घेतली अण्णा हजारेंची भेट

निलेश लंकेची राजकीय खेळी, राळेगणसिद्धीत घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तीन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. राज्यात सध्या बीड, कोल्हापूर या काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांसोबतच अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध माजी आमदार निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार असून या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे याच लोकसभेनिमित्ताने मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. ज्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024 Nilesh Lanke met Anna Hazare at Ralegansiddhi)

मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले लंके यांनी लोकसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी पुन्हा शरद पवारांच्या गोटात येण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सध्या लंके यांच्याकडून नगर लोकसभेत जोरदार प्रचार सुरू असून ते मतदारसंघामधील जुन्या जाणत्या नेत्यांची भेट घेत आहेत. याचेच औचित्य साधत त्यांनी आज गुरुवारी (ता. 02 मे) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीचे रहिवासी आहेत.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : ठाण्यात प्रचारासाठी सहकार्य करणार, भाजपची भूमिका; नरेश म्हस्केंचे स्पष्टीकरण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर मविआचे नगरचे उमेदवार निलेश लंके यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली. X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची माहिती देत लंकेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आली.” त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांची ही राजकीय खेळी विद्यमान खासदार सुजय विखे यांनी भारी पडण्याची शक्यता आहे. कारण अण्णा हजारे यांच्या शब्दाला राळेगणसिद्धीमध्ये मोठा मान आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचारमुक्त भारत आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांनी जनआंदोलन केले होते. अण्णांच्या या आंदोलनामुळे देशभरातील तरुणाई एकटवली होती. तेव्हापासून अण्णांच्या शब्दाला देशात मान आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणातही अण्णांना विशेष स्थान आहे.

हेही वाचा… Ajit Pawar : त्यांची ती स्ट्रॅटेजी, मग आमची ती गद्दारी का? अजित पवारांचा सवाल 


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 2, 2024 9:22 PM
Exit mobile version