Lok sabha Election 2024 : मतदारांच्या बोटाला लागणार ७ हजार ४२५ बाटल्यांमधील शाई

Lok sabha Election 2024 : मतदारांच्या बोटाला लागणार ७ हजार ४२५ बाटल्यांमधील शाई

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील मतदारांना मतदान साहित्य पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी मतदारांना तब्बल ७ हजार ४२५ बाटल्या शाईची गरज भासणार आहे. रायगड जिल्ह्यात २ हजार ७१९ मतदानकेंद्र असणार आहेत. यात रायगड लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश आहे.

मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रावर आवश्यक ते साहित्य पाठवण्याची जबाबदारी साहित्य व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, उरण, कर्जत, पनवेल असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील उरण, कर्जत, पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली विधानसभा हे रायगड मतदारसंघात जोडले गेले आहेत.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : घरून मतदानासाठी 36 हजारांहून अधिक मतदार इच्छुक

संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख ६६ हजार ५८ आहे. जिल्ह्यातील २ हजार ७१९ मतदार केंद्रांपैकी अलिबाग विधानसभा मतदारसंघात ३७३ मतदान केंद्र, पेण मतदारसंघात ३७५, श्रीवर्धनमध्ये ३५२, महाडमध्ये ३९३, उरणमध्ये ३४४ मतदान केंद्र, कर्जतमध्ये ३३९ आणि सर्वाधिक ५४४ मतदान केंद्रे पनवेल विधानसभा मतदारसंघात आहेत. या सर्व मतदारांसाठी एकूण ७ हजार ४२५ शाईच्या बाटल्या तयार ठेवल्या आहेत. प्रत्येक शाईच्या बाटलीची क्षमता १० सीसी आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : 40 टक्के मतदारांनी मतदानाला अंगठा का दाखवला?

मतदानानंतर मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला (अंगठ्याजवळील बोट) शाई लावली जाते. ती पुसली जाऊ नये, याकरिता शाईवर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे एक मतदार एकदाच मतदान करू शकतो. शाई लावलेले बोट पाण्याच्या संपर्कात आल्यास शाईचा रंग काळा होतो. ही शाई ‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखली जाते. ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघात तर १३ मे रोजी मावळ मतदारसंघात मतदान होार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी तथा साहित्य समितीचे नोडल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

तयारी पूर्ण!

प्रत्येक मतदान केंद्रावर १० सीसीच्या दोन शाईच्या बाटल्या द्याव्या लागणार आहेत. मतदानासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य मागणीनुसार आले आहे. या साहित्याची सर्व जबाबदारी साहित्य व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे.
– किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी

रायगडमधील मतदान केंद्रांवरील साहित्य

 

First Published on: April 22, 2024 11:45 PM
Exit mobile version