Lok Sabha 2024 : आरोप-प्रत्यारोपात राणा पाटलांचे ओमराजेंना आव्हान; म्हणाले …तर राजकारण सोडीन

Lok Sabha 2024 : आरोप-प्रत्यारोपात राणा पाटलांचे ओमराजेंना आव्हान; म्हणाले …तर राजकारण सोडीन

धाराशिव : लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीवरून धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यानुसार, ओमराजे निंबाळकर यांनी नवी मुंबईतल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयावरून राणा पाटलांवर अनेक आरोप केले होते. त्याच आरोपांवर उत्तर देताना राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांना आव्हाना दिले आहे. ‘ओमराजेंनी आरोप सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन’, असे राणा पाटील म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Ranajagjitsinha Patil Slams Omraje Nimbalkar Osmanabad Lok Sabha)

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यंदा धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अर्चना पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. अर्चना पाटील या तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आहे. अर्चना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा – Lok Sabha : महाराष्ट्रात आई भवानीच्या नाही तर कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? दानवेंचा निवडणूक आयोगाला सवाल

अर्चना पाटील यांन धारशिवमधून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यात धाराशिवमधील प्रचारसभेत ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटलांवर गंभीर आरोप केले होते. त्यानुसार, “1983 साली सरकारने धाराशिवसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. परंतु, हे वैद्यकीय महाविद्यालय त्यांनी (पद्मसिंह पाटील) नवी मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणी नेले. नेरूळ हा काय आदिवासी भाग आहे का? धाराशिवमधील लोक यांच्यासाठी मतदान करणार, दवाखान्याची आवश्यकता धाराशिवच्या लोकांना, धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची आवश्यकता, पण यांनी (पाटील कुटुंब) हे वैद्यकीय महाविद्यालय नेरुळला नेले. ही आपल्या मतदारसंघाची मोठी शोकांतिका आहे. त्यांनी ते वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नेरुळला नेलं पण, त्यांनी महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या मालकीचे केले. त्यांनी स्वतःची एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट काढली आणि ते महाविद्यालय आता या ट्रस्टच्या मालकीचे आहे”, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

याशिवाय, “मी राणा पाटलांना जाहीर आव्हान देतो की, त्यांनी 1983-84 नंतर 2024 पर्यंत धाराशिवमधील एका तरी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला त्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देऊन डॉक्टर केले आहे का ते सांगावे. एक तरी डॉक्टर त्यांनी दाखवावा. मी ठामपणे सांगतो की, त्यांनी असा एकही डॉक्टर घडवलेला नाही”, असे आरोप ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांवर केले आहेत.

दरम्यान, ओमराजे निंबाळकरांच्या याच आरोपांवर राणा जगजीतसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर देत त्यांना आव्हान दिले आहे. त्यानुसार, “आमचा प्रतिस्पर्धी हा खोटारडा माणूस आहे. त्यांचं खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी करणं चालू असतं. परंतु, ती बोलबच्चनगिरी आता खपवून घेतली जाणार नाही. हा विरोधक खोटारडा आहे. तो म्हणे इथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं होतं ते आम्ही दुसरीकडे नेलं. असं झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो. तो माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. त्यापेक्षा जास्त काय बोलायचं? एकतर त्याला काही समजत नसेल किंवा तो खोटं बोलत असेल”, अशा शब्दांत राणा पाटलांनी प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 8:13 AM
Exit mobile version