Lok Sabha 2024 : प्रचार संपल्यानंतर बारामतीत गुंडाच्या वापरावरुन राजकारण; रोहित पवार – मिटकरी आमनेसामने

Lok Sabha 2024 : प्रचार संपल्यानंतर बारामतीत गुंडाच्या वापरावरुन राजकारण; रोहित पवार – मिटकरी आमनेसामने

बारामतीमध्ये गुंडाकडून प्रचार रोहित पवारांचा आरोप

बारामती – महाराष्ट्रातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. पवार विरुद्ध पवार लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर त्यांच्याविरोधात शरद पवारांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे या मैदानात आहेत. पवार कुटुंबामध्येही या निवडणुकीमुळे दोन गट तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीसाठी उद्या मंगळवारी, 7 मे रोजी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झडत आहेत.

जाहीर प्रचारानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

बारामतीमधील जाहीर प्रचार थांबल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांकडून निवडणुकी गुंडाचा वापर होत आहे, गुंडाची मदत निवडणुकीत घेतली जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्याला अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत, रोहित पवारच गुंड असल्याची टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून 14-15 गुंडाचा वावर वाढला आहे. गुंडच जर अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार असतील तर आगामी काळामध्ये लोकांना गुंडांचेच सरकार पाहायला मिळेल. भाजपच्या नेतृत्वात गुंडच सत्तेवर येतील, असाच संदेश सध्या दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी, मतदारांनी मतदान करताना आपल्याला सामान्य लोकांचे सरकार आणायचे आहे की गुंडांचे याचा विचार करावा, असे आवाहन केले.

गुंड लोक भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत असतील तर त्यांना सत्तेचा वरदहस्त असल्याशिवाय असे घडू शकत नाही. उद्या हेच गुंड कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत येतील, तेव्हा सरकार त्यांच्यासोबत असेल, असा दावा रोहित पवारांनी केला.

रोहित पवारांच्या आरोपांना मिटकरींचे प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या या आरोपांना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, रोहित पवार हेच गुंड आहेत. बारामतीचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचे काम ते करत आहेत. रोहित पवार यांच्यासोबत कोणकोण फिरतं आणि मतदारसंघात त्यांचं काय सुरु असतं हेही लोक पाहात आहेत.

हेही वाचा : मराठी माणसाला नाकारणारा गुजराती अहंकार मोडून काढणार; रोहित पवार राज्य सरकारवर कडाडले


Edited by – Unmesh Khandale 

First Published on: May 6, 2024 4:26 PM
Exit mobile version