Lok Sabha 2024 : आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

Lok Sabha 2024 : आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : अटीतटीच्या लढतींमुळे चर्चेत असलेल्या राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीसह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आज मतदान होऊ घातलेल्या आठपैकी बहुतांश मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत असून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 208 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.  (Lok Sabha Election 2024 second phase voting in Maharashtra)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक अयोग आणि पोलीस यंत्रणा सिद्ध झाली आहे. आठ मतदारसंघात जवळपास 16 हजार 589 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या आठही मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या लक्षणीय असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परभणीत सर्वाधिक 42, तर त्या खालोखाल नांदेडमध्ये 31 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदान केंद्राच्या बाहेर विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात असतील.

हेही वाचा – MNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले…

आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिल्या टप्प्यात तुलनेने मतदानाचा टक्का घसरल्याने दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी जास्तीत जास्त मतदानात सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. प्रखर उन्हामुळे मतदार सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान मतदानासाठी फारसं बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ऊन उतरल्यानंतर म्हणजे संध्याकाळी मतदान केंद्रावर मतदार गर्दी करेल असा अंदाज आहे. त्यामुळे संध्याकाळी सहावाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदाराला वेळ संपल्यानंतरही मतदान करता येणार आहे.

बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena vs Shiv Sena in Buldhana)

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी प्रमुख लढत असली तर शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे येथे तिरंगी लढत आहे. शिवसेना शिंदे गटाने येथून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाने जाधव यांना नरेंद्र खेडेकर यांच्या रूपाने आव्हान दिले आहे. बुलडाण्यात जाधव आणि खेडेकर यांच्यात प्रमुख लढत असली तरी रविकांत तुपकर यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने येथील निवडणूक रंगतदार झाली आहे.

हेही वाचा – Lok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून टीका

अकोल्यात तिरंगी लढत (A triple fight in Akola)

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे चर्चेत असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला होत असल्याचे गेल्या काही निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे यंदाही गेल्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल की अकोल्याचे मतदार वेगळा कौल देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोल्यात भाजपाचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे आणखी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावतीत भाजपाला प्रहारचे आव्हान (A challenge to BJP in Amravati)

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती या संघटनेने आव्हान दिले आहे. काँग्रेस उमेदवारासह वंचितच्या पाठिंब्याने रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत. येथील चौरंगी लढतीमुळे अमरावतीची  निवडणूक लक्षवेधी बनली आहे. मावळत्या खासदार नवनीत राणा यांना पक्षात घेऊन भाजपाने उमेदवारी दिली आहे. राणा यांना विरोध म्हणून महायुतीत सहभागी असलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बंडखोरी करत दिनेश बूब हा स्वतंत्र उमेदवार उतरविला आहे. भाजपाचे नेते अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेमुळे अमरावतीच्या लढतीविषयी राज्यभर उत्सुकता आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींच्या राज्यात महिलांची मंगळसूत्रे गहाण पडली; संजय राऊत यांची टीका

वर्धामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस (BJP vs Congress in Wardha)

वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रामदास तडस हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झालेल्या तडस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमर काळे यांनी आव्हान दिले आहे. काळे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच पक्षाने त्यांना वर्ध्यातून उमेदवारी दिली. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळुंखे हेही निवडणूक रिंगणात आहेत.

यवतमाळ-वाशिममध्ये ठाकरे गटाचे पारडे जड (Thackeray group strong in Yavatmal-Washim)

महायुतीच्या जागावाटपात यवतमाळ वाशिमचा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. भाजपाच्या दबावाला बळी पडून शिंदे यांनी येथून भावना गवळी यांच्याऐवजी हिंगोलीचे मावळते खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. विरोधी पक्ष उद्धव ठाकरे गटाकडून राजश्री पाटील यांचा उल्लेख  बाहेरचा उमेदवार असा केला गेला. ठाकरे गटाने येथून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे वंचित आघाडीचा उमेदवार निवडणूक रिंगणात असला तरीही यवतमाळ- वाशिममध्ये मुख्य लढत ही शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: स्वत:च्या कुटुंबावर आलं म्हणून घटना बदलली; मोदींचा गांधी कुटुंबावर हल्ला

हिंगोलीत ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला (Thackeray group reputation stake in Hingoli)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मावळते खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊनही भाजपाच्या दबावामुळे उमेदवारी मागे घ्यावी लागल्यामुळे चर्चेत आलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मातोश्रीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत केले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना निकराचा लढा द्यावा लागत आहे. वंचितने येथून डॉ. डी. बी. चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. वंचितच्या उमदेवारीचा लाभ शिवसेनेच्या दोन उमेदवारांपैकी कुणाला मिळणार याविषयी उत्सुकता आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसची कसोटी (Congress test in Nanded)

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची कसोटी लागली आहे. चव्हाण भाजपामध्ये गेल्याने काँग्रेस प्रथमच नांदेडमध्ये चव्हाण यांच्याविना लढत आहे. दोनवेळा खासदार राहिलेले प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने येथून माजी आमदार वंसत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश भोसीकर निवडणूक लढवत आहेत. भाजपाने नांदेडची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे भाजपामध्ये गेलेल्या चव्हाण यांना या निवडणुकीच्या निमित्ताने आपली  राजकीय उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

परभणीत दुरंगी सामना (Hard-Fought Match In Parbhani)

परभणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असा दुरंगी सामना आहे. महायुतीने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा जानकर यांना दिली आहे. जानकर हे प्रथमच मराठवाड्यातून निवडणूक लढवत आहेत. जानकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर संजय जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डख हे निवडणूक लढवत आहेत.

मतदारसंघ                     उमेदवारांची संख्या           मतदान केंद्रे

बुलडाणा                                     21                        1 हजार 962
अकोला                                      15                        2 हजार 56
अमरावती                                    37                        1 हजार 983
वर्धा                                          24                        1 हजार 997
यवतमाळ-वाशिम                           17                        2 हजार 225
हिंगोली                                      33                        2 हजार 8
नांदेड                                       23                        2 हजार 68
परभणी                                     34                        2 हजार 290

————————————————————–

गेल्या दोन निवडणुकीतील मतदान

मतदारसंघ                           2019                           2014

बुलडाणा                             63.56 टक्के                       61.35 टक्के
अकोला                              59.99 टक्के                       58.51 टक्के
अमरावती                            60.36 टक्के                       62.29 टक्के
वर्धा                                  61.26 टक्के                       64.79 टक्के
यवतमाळ-वाशिम                   61.10 टक्के                        58.87 टक्के
हिंगोली                              66.50 टक्के                        66.29 टक्के
नांदेड                                65.16 टक्के                        60.11 टक्के
परभणी                              63.08 टाके                         64.44 टक्के

Edited By – Rohit Patil

First Published on: April 26, 2024 7:19 AM
Exit mobile version